सुरक्षेची हमी मिळाल्यानंतर अखेर पाकिस्तानच्या संघाचे शनिवारी रात्री भारतात आगमन झाले आणि त्यांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील समावेशाबाबतच्या संदिग्धतेला पूर्णविराम मिळाला.

पाकिस्तानचे एकूण २७ सदस्य अबुधाबीहून भारतात दाखल झाले. या २७ जणांमध्ये १५ खेळाडू आणि १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शनिवारी रात्री येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियमवर कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये आगमन झाले. त्यानंतर इमिग्रेशनची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्यांना एका तासाचा अवधी लागला. पाकिस्तानच्या खेळाडूंना पाहण्यासाठी या वेळी चाहत्यांनी गर्दी केली असली तरी भारतीय संघांच्या घोषणांनीच सारा परिसर दणाणून गेला होता.

पाकिस्तान संघाला भारतात येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांचा पहिला सराव सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण सोमवारी त्यांचा सराव सामना श्रीलंकेबरोबर नियोजित कार्यक्रमानुसार होणार आहे.