Pakistan Team In India For ICC World Cup 2023: आयसीसी विश्वचषक २०२३ साठी भारतात आलेल्या पाकिस्तानच्या संघाचा चांगलाच पाहुणचार होत आहे. पाकिस्तानी संघाचं दमदार स्वागत आणि मग हैदराबादमध्ये त्यांच्यासाठी खास मेजवानी यामुळे खेळाडू सुद्धा भारावून गेले आहेत. याविषयी अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे. तर आता पाकिस्तानच्या उपकर्णधाराचा म्हणजेच शादाब खानचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
पाकिस्तानचा संघ गोलकोंडा रिसॉर्ट येथील आयकॉनिक ज्वेल ऑफ निजाम रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला असता त्यांना तिथले जेवण खूप आवडले होते रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शादाबने हैदराबादी खाद्यपदार्थ आणि हैदराबादच्या ‘मेहमान-नवाजी’बद्दलही मनसोक्त गप्पा मारल्या. रोजच्या चविष्ट जेवणामुळे आमचे फॅट्स आणि वजन सुद्धा वाढेल अशी भीती वाटतेय असं शादाब गमतीत म्हणाला. आम्ही इथे तर खूप एन्जॉय केलं आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी अहमदाबादला जाऊ तेव्हा सुद्धा असंच प्रेमाने स्वागत होईल अशी अपेक्षाही शादाबने व्यक्त केली.




शादाबचा आवडता भारतीय फलंदाज आणि गोलंदाज
एका पत्रकाराने विचारले असता त्याने सध्याचा आपला आवडता भारतीय फलंदाज आणि गोलंदाज कोण हे सुद्धा सांगितले. “फलंदाज म्हणून, रोहित शर्मा, मला तो खरोखर आवडतो. तो सेट झाल्यावर त्याच्यासाठी गोलंदाजी करणे खूप कठीण होतं. आणि गोलंदाज म्हणून निवडताना मी स्वतः एक लेग-स्पिनर आहे म्हणून मी कुलदीप यादवची निवड करेन, कारण अलीकडेच तो कमाल फॉर्ममध्ये आला आहे.
हैदरबादमध्ये ३ व ६ ऑक्टोबरला पाकिस्तानचे सराव सामने होणार आहेत. हैदराबादमधील खेळपट्टीविषयी बोलताना शादाबने ही स्थिती रावळपिंडीतील मैदानांसारखीच असल्याचे म्हटले. शिवाय तो पुढे म्हणाला की, “मला वाटते की जो संघ चांगली गोलंदाजी करेल तोच विश्वचषक जिंकेल. सपाट ट्रॅक आणि लहान चौकारांमुळे येथे फलंदाजांच्या धावा रोखणे कठीण आहे. आमच्याकडे जागतिक दर्जाची गोलंदाजी लाइनअप आहे. आम्ही चांगली गोलंदाजी केली तर आम्ही चॅम्पियन होऊ शकतो. “