Pakistan Test Squad for WI and ENG Series: पाकिस्तान क्रिकेट संघात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. या कसोटी संघाचा कर्णधार बदलला असून आता पाकिस्तानने कसोटी संघाची जबाबदारी पुन्हा एकदा अनुभवी बाबर आझमच्या खांद्यावर दिली आहे. पाकिस्तानचा कसोटी संघ गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. घरच्या मैदानावरही संघाला अनेक धक्कादायक पराभवांचा सामना करावा लागला असून फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांतील अस्थिरता स्पष्टपणे दिसून आली आहे.

नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय मालिकांमध्येही पाकिस्तानला अपेक्षित यश मिळालं नाही. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारांत संघाची कामगिरी चढ-उताराची राहिली असून नेतृत्व, संघनिवड आणि सातत्यपूर्ण प्रदर्शन यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, यादरम्यान आता पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने नेतृत्त्वात मोठा बदल करत बाबर आझमकडे नेतृत्त्व सोपावलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेत शान मसूदला कसोटी कर्णधारपदावरून हटवलं असून, यामुळे बाबरच्या या भूमिकेतील पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला. २०२३ च्या अखेरीस कर्णधारपदाचा राजीनामा दिलेल्या बाबर आझमचं आता पाकिस्तानच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी पुनरागमन होणार आहे. बाबर आझमने आतापर्यंत २० कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व केलं असून, त्यापैकी १० सामन्यांत विजय मिळवला आहे. याउलट, शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला १६ पैकी १२ कसोटी सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला; हेच या बदलामागचं मुख्य कारण आहे.

पाकिस्तानच्या संघात ४ नव्या चेहऱ्यांना संधी

निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी १६ खेळाडूंचा संघ निवडला आहे. त्याच वेळी, इंग्लंड दौऱ्यासाठी १७ सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. सौद शकीलचा इंग्लंड दौऱ्याच्या संघात १७वा खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे, मात्र त्याचा सहभाग पूर्णपणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. याव्यतिरिक्त, देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे डावखुरे फिरकी गोलंदाज अली उस्मान, उजव्या हाताचा फलंदाज मोहम्मद ओवेस जफर, वेगवान गोलंदाज उबैद शाह आणि यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद गाझी घोरी यांचा पहिल्यांदाच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

पाकिस्तानचा कसोटी संघ

बाबर आझम (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला फजल, अली उस्मान, अझान अवेस, इमाम-उल-हक, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अली, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद अवैस जफर, मोहम्मद गाझी घोरी (विकेटकीपर), साजिद खान, सलमान अली आघा, मस्सूद शाह, मस्तीद शाह आणि शान.