पाकिस्तान क्रिकेट संघ टी२० वर्ल्डकप स्पर्धेत भारताविरुद्ध होणाऱ्या लढतीवर बहिष्कार टाकणार आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी स्पर्धेतून माघार घेण्याचे संकेत दिले होते. मात्र आर्थिक नुकसान पाहता त्यांनी माघारीचा निर्णय रद्द केला. पाकिस्तानचा संघ काही तासात वर्ल्डकपसाठी रवाना होतो आहे मात्र स्पर्धेतल्या सगळ्यात बहुचर्चित लढतीवर त्यांनी बहिष्कार टाकायचं पक्कं केलं आहे.

पाकिस्तान सरकारच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली. पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला टी२० वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यास अनुमती दिली आहे. मात्र पाकिस्तान संघाने भारताविरुद्धचा सामना खेळू नये असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पाकिस्तानचा संघ त्यांचे सामने श्रीलंकेत खेळणार आहे. भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचं कारण पाकिस्तान सरकारने स्पष्ट केलेलं नाही.

सुरक्षिततेच्या कारणास्तव बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला. बांगलादेशने गट बदलण्याची तसंच लढती श्रीलंकेत खेळवण्याची विनंती केली मात्र लॉजिस्टिक्सच्या मुद्याचं कारण देत आयसीसीने ही मागणी फेटाळली. भारतात खेळण्यास कोणताही धोका नाही असं आयसीसीच्या सुरक्षा पथकाने स्पष्ट केलं. मात्र त्यानंतरही बांगलादेशने भारतात न खेळण्याचा निर्णय घेतला. सामने अन्यत्र होणार नसल्याने अखेर बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी बांगलादेशला पाठिंबा म्हणून पाकिस्तानचा संघही स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा विचार करत आहे असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी म्हटलं होतं. मात्र वर्ल्डकपवर बहिष्कार टाकल्यास प्रचंड आर्थिक फटका बसू शकतो तसंच भविष्यात आयसीसी स्पर्धांचं आयोजन हातातून जाऊ शकतं हे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानच्या गटात भारत, नामिबिया, नेदरलँड्स, अमेरिका हे अन्य देश आहेत. पाकिस्तानचा संघ बाकी देशांविरुद्ध खेळणार आहे. मात्र भारताविरुद्धचा १५ फेब्रुवारीला होणारा सामना खेळणार नाही.

Pakistan Government Post for T20 World Cup India match Boycott
पाकिस्तान सरकारचं टी-२० वर्ल्डकपमधील भारताविरूद्ध सामन्यावर बहिष्कार टाकणार असल्याचं ट्विट

मायदेशात आजच आटोपलेल्या टी२० मालिकेत पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करत वर्ल्डकपसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. तो सामना संपतोच तोच ही पोस्ट समोर आली आहे. पाकिस्तान आणि वादविवाद यांचं नातं जुनं आहे. मोहसीन नक्वी यांनी आशिया चषक स्पर्धेचा चषक भारतीय संघाला देण्यावरून वाद निर्माण झाला होता. अद्यापही तो वाद शमलेला नाही.