न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेचा हवाला देत शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पहिला चेंडू टाकण्यास काही तासांचा अवधी असताना पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या या भूमिकेमुळे क्रिकेट जगतात पाकिस्तानला लाजीरवाणं व्हावं लागलं. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या ऑफिशिय़ल ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली, मात्र या पोस्टमधील एका चुकीमुळे त्यांना आता ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) लिहिले आहे की, ”न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आम्हाला सूचित केलं की, त्यांना काही सुरक्षा अलर्टकडून सतर्क करण्यात आलं आहे आणि त्यांना एकतर्फी मालिका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबी आणि पाकिस्तान सरकारने येणाऱ्या सर्व संघांसाठी सुरक्षेची FOOL प्रूफ व्यवस्था केली आहे.”

या ट्विटमध्ये पीसीबीकडून FULL च्या जागी FOOL लिहिल्या गेलं आहे. FOOL चा अर्थ मूर्ख असा होतो. त्यामुळे युजर्सनी ही चूक पकडून त्यावरून पीसीबीला ट्रोल करणं सुरू केलं आहे.

एक यूजरने लिहिलं की, तुमची FOOL प्रुफ सिक्युरिटी पाहूनच त्यांनी असा निर्णय घेतला असेल. तर, दुसऱ्या यूजर्सने म्हटले की, FOOL प्रुफ होती म्हणून तर ते पळत आहेत, Full प्रूफ असती तर नसते गेले.

‘‘खेळाडूंची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असल्यामुळे अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. दौरा चालू ठेवणे अशक्य असल्याचा सल्ला आम्हाला देण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला,’’ असे न्यूझीलंड क्रिकेट संघटनेचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाइट म्हणाले आहेत. सुरक्षेच्या धोक्याबाबत मात्र भाष्य न्यूझीलंडच्या संघटनेने केले नाही.

न्यूझीलंडची पाकिस्तान दौऱ्यातून माघार!

‘‘पाकिस्तान क्रिकेट मंडळ आणि येथील सरकारकडून सर्व पाहुण्या संघांसाठी उत्तम सुरक्षा व्यवस्था करते. न्यूझीलंड क्रिकेट संघासाठीसुद्धा आम्ही याच पद्धतीने व्यवस्था राखली होती. परंतु न्यूझीलंडने मालिका लांबणीवर टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे,’’ असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून सांगण्यात आले आहे. १८ वर्षांनंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिका खेळणार होता.