टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडिया निराश झाली आहे. या पराभवामुळे टीम इंडियाच्या मनोबलावर परिणाम झाला असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला प्रचंड घाम गाळावा लागणार आहे. आता यापुढचे आव्हान टीम इंडियासाठी अवघड असण्याची शक्यता आहे. दरम्यान पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकला तर त्याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो, असे मत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने व्यक्त केले. त्याच्या मते, यामुळे भारताची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता खूप वाढेल.
टी -२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानने भारतीय संघाचा एकतर्फी पराभव करत विश्वचषकातील आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. आता त्यांचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध आहे.
पाकिस्तान संघ भारताला मदत करेल
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “न्यूझीलंडला हरवून पाकिस्तान संघ भारताला मदत करेल असे मला वाटते. पण जर न्यूझीलंडने पाकिस्तानला हरवले तर अशा परिस्थिती तीन प्रकारे घडू शकतात. जर भारताने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला तर नेट रन रेट महत्त्वाचा असेल. तिन्ही संघ त्यांचे उर्वरित सामने जिंकतील असे मी गृहीत धरत आहे. पाकिस्तान संघाने न्यूझीलंडला हरवले तर अफगाणिस्तान हा एकमेव संघ उरणार आहे. याशिवाय स्कॉटलंड आणि नामिबिया देखील आहेत. त्यानंतर पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचेल.”
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला की, पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही किमतीत जिंकले पाहिजे. एक देश म्हणून आम्ही न्यूझीलंडवर खूश नाही आणि त्यांच्याविरुद्धचा सामना खूप मोठा असणार आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक आहोत आणि त्यांच्याविरुद्ध आम्हाला सामना जिंकायचा आहे.