Pakistan withdraws World Championship of Legends Season 3 PCB controversy: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL)च्या तिसऱ्या हंगामातून पाकिस्तानने अधिकृतपणे माघार घेतली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार नाही. यापूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना ‘तांत्रिक कारणांमुळे’ पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) नो हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळण्याची टीम मॅनेजमेंट वाट पाहत असल्याची माहिती समोर आली होती. पण रिपोर्ट्समध्ये मात्र वेगळीच माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान संघाला (NOC) ना हरकत प्रमाणपत्र दिलं; मात्र त्याचबरोबर काही अटीही घातल्या होत्या. WCLच्या आयोजकांनी या अटी मान्य करण्यास नकार दिल्याने पाकिस्तानने अखेर स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
भारत-पाकिस्तान वाद पुन्हा चर्चेत
गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन ऑफ लिजेंड्स स्पर्धेमध्ये भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे सुरुवातीला दोन्ही संघांमधील साखळी फेरीतील सामना रद्द करण्यात आला. यानंतर उपांत्य फेरीतही भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्यास नकार दिला. परिणामी पाकिस्तानला वॉकओव्हर मिळून अंतिम फेरीत प्रवेश मिळाला, मात्र अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव केला. या संपूर्ण प्रकरणादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये हस्तांदोलनही झालं नव्हतं. सारखीच घटना आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्येही पाहायला मिळाली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या या प्रकरणाबद्दल भारतीय संघाने माफी मागावी, अशी मागणी पीसीबीकडून करण्यात आली होती. मात्र, WCLच्या आयोजन समितीने ही मागणी मान्य केली नाही. त्यानंतर पाकिस्तान बोर्डाच्या अटी आणि आयोजकांमधील मतभेद वाढले आणि पाकिस्तानने स्पर्धेच्या तिसऱ्या सीझनमधून माघार घेतली.
PCBच्या नेमक्या काय होत्या अटी? भारताकडून माफी आणि हँडशेकची मागणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीसीबीने WCLमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान चॅम्पियन्सला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यास सहमती दर्शवली होती; मात्र त्यासाठी काही अटी घातल्या होत्या. WCL व्यवस्थापनाने बोर्डाच्या या मागण्या मान्य केल्या नाहीत. सूत्रांनी हिन्दुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध मैदानात न उतरल्याबद्दल भारतीय खेळाडूंनी लेखी माफी मागावी, अशी पीसीबीची प्रमुख मागणी होती. याशिवाय, यंदा भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास सहमती दर्शवावी, अशीही बोर्डाची इच्छा होती.
मात्र, WCL व्यवस्थापनाने व्यावसायिक बाबींशी संबंधित अटी स्वीकारल्या, पण भारतीय खेळाडूंच्या माफीची आणि हँडशेकची मागणी नाकारली. त्यामुळे अखेर पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली.
भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रद्द
WCLच्या तिसऱ्या सीझनमध्ये यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात १० ऑक्टोबरला भारत चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात सामना होणार असल्याचं नमूद केलं होतं. मात्र, पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतल्याने आता हा सामना होणार नाही. WCLने सोमवारी पाकिस्तानच्या संघाने माघार घेतल्याची अधिकृत घोषणा केली. आयोजकांनी सांगितलं की, अनपेक्षित परिस्थितीमुळे पाकिस्तान चॅम्पियन्स WCL Season 3 मध्ये सहभागी होणार नाहीत. त्यामुळे स्पर्धेत आता सहा संघ राहिले आहेत.
दरम्यान, पाकिस्तान चॅम्पियन्सच्या अधिकृत निवेदनात पीसीबीच्या कोणत्याही अटी किंवा भारतासोबतच्या हँडशेकचा उल्लेख करण्यात आलेला नाही. संघाने केवळ पीसीबीकडून आवश्यक NOC न मिळाल्यामुळे स्पर्धेतून माघार घेतल्याचं म्हटलं आहे.
