Pakistan women cricket team controversy: महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. संघाची कामगिरी खराब होत असताना संघांतर्गत मतभेद झाल्याचे वृत्त देखील समोर येत आहेत. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी, आलिया रियाझचा पती तिच्या खोलीत राहत होता आणि कर्णधार फातिमा सनाने यावर आक्षेप घेतला होता, असा दावा समाज माध्यमांवरील अनेक पोस्ट्समधून केला जात आहे.
फातिमा सनाने आणि आलिया रियाझ यांच्या वाद
“कर्णधार फातिमा सनाने आक्षेप घेतल्यानंतरच अली युनिसला खोली रिकामी करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर, बांगलादेशविरुद्धच्या सामन्याच्या आदल्या दिवशी, संघाचे सराव सत्र नियोजित होते, तेव्हा आलिया आणि तिचा पती अली फिरायला बाहेर गेले होते,” असेही एका वृत्तात नमूद करण्यात आले आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून सनाला आलियाला संघातून वगळायचे होते, परंतु वहाब रियाझ यांनी तिच्या नावाचा आग्रह धरला, असा देखील दावा केला जात आहे.
सना आणि वहाब रियाझ यांचेही खटकले
या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला शिवाय आलियाची कामगिरी देखील निराशाजनक ठरली. यामुळे संतापलेल्या सनाने सर्वांसमोर वहाब सुनावल्याची माहिती विविध क्रीडाशी निगडीत माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे. यामुळे संघाचे मेंटर म्हणून काम पाहणारे वहाब रियाझ आणि कर्णधार फातिमा सना यांच्यातील मतभेद देखील उघड झाले आहेत. संघात अंतर्गत गटबाजी आणि काही वरिष्ठ खेळाडू व प्रशिक्षकांमधील संबंध ताणले गेल्याचेही वृत्तात म्हटले आहे.
संघाची निराशाजनक कामगिरी
मंगळवारी रात्री लीड्स येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. एकीकडे संघाची कामगिरी खराब असताना संघातील अंतर्गत मतभेद आणि वाद उफाळून आलेत आहेत. दरम्यान, २०२३ आणि २०२४ च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पुरुष संघाला अपयश आल्यानंतर, ड्रेसिंग रूममधील वादाच्या अनेक घटना समोर आल्या होत्या, यापैकी अनेक खऱ्या असल्याचे नंतर उघडकीस आले होते.
