INDW vs PAKW Handshake snub Womens T20 WC 2026: महिला टी-२० विश्वचषक सामन्यात भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध झाला होता. या सामन्यात टीम इंडियाने ६४ धावांनी विजय मिळवत कमाल सुरूवात केली. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर झालेला भारत-पाकिस्तान सामना एकतर्फी ठरला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. मात्र सामन्याइतकीच चर्चा पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सामन्यानंतर हस्तांदोलन न केल्याची झाली. याबाबत आता पाकिस्तान संघाच्या कोचने मोठं वक्तव्य केलं.

आशिया चषक २०२५ पासून सुरू झालेला ‘नो हँडशेक’ पवित्रा अद्याप कायम असून, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा सामन्यानंतरच्या पारंपरिक हस्तांदोलनाला नकार दिला. तर महिला टी-२० विश्वचषक २०२६ला नाणेफेकीच्या वेळीही हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना यांनी एकमेकांकडे न पाहताच आपआपल्या मार्गाला गेल्या.

सामन्यानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक वहाब रियाझ यांना या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. हस्तांदोलन का होत नाही याचं नेमकं कारण आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, मात्र यामुळे फारसा फरक पडत नसल्याचेही त्यांनी सांगितलं.

पत्रकाराने पाकिस्तानच्या कोचला प्रश्न विचारला, “आज पुन्हा एकदा हस्तांदोलन झालं नाही, हे आम्ही पाहिलं. दोन्ही संघांतील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्यातील संबंध नेमके कसे आहेत? मैदानाबाहेर मैत्रीपूर्ण वातावरण असतं का, की तणाव कायम असतो?”

त्यावर वहाब रियाझ म्हणाला, “पाहा, मला याबद्दल फारशी माहिती नाही. मी खूप आधी क्रिकेटमधून निवृत्त झालो आहे, त्यामुळे हस्तांदोलन का होत नाही याचं कारण मला माहीत नाही. पण जर गोष्टी अशाच पद्धतीने पुढे जाणार असतील, तर जाऊ द्या. त्याने काही मोठा फरक पडणार नाही.”

कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारतीय संघाने सर्वच विभागांत वर्चस्व गाजवत ६४ धावांनी शानदार विजय मिळवला. भारताच्या विजयात स्मृती मानधाना, दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांचं योगदान विशेष ठरलं. पराभवानंतर बोलताना पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक वहाब रियाझ म्हणाले, “माझ्या मते आम्ही अतिरिक्त १५ ते २० धावा दिल्या. अखेरच्या दोन षटकांत वर्तुळाच्या आत एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवावा लागला आणि त्याचा भारताला फायदा झाला. सीमारेषेवर फक्त तीन क्षेत्ररक्षक असल्याने त्यांना गती मिळाली. माझ्या मते त्या १५ ते २० अतिरिक्त धावा सामन्यात निर्णायक ठरल्या.”