पाकिस्तानने १८ वर्षांनंतर तिरंगी मालिकेचं जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. श्रीलंकेने दिलेलं ३२६धावांचं लक्ष्य ३ विकेट्स आणि ९ चेंडू राखून जिंकत पाकिस्तानने जेतेपदावर नाव कोरलं.
पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेने कामिंदू मेंडिसच्या शतकाच्या बळावर ३२५ धावांचा डोंगर उभारला. कामिंदूने १२ चौकार आणि २ षटकारांसह १३१ धावांची खेळी केली. पवन रत्नायकेने ७७ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १४६ भागीदारी केली. पाकिस्तानतर्फे शाहीन शहा आफ्रिदी, नसीम शहा, सलमान अघा आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था १४/२ अशी होती. मात्र यानंतर फखर झमान आणि साद बेग यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी केली. ७४ धावांची खेळी करून बाद झाला. ११ चौकार आणि ६ षटकारांसह १२७ धावांची तडाखेबंद खेळी करून फखर झमान बाद झाला. अराफत मिन्हासने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ६१ धावांची खेळी करत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हसन नवाझने नाबाद ३७ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ६५ चेंडूत ९५ धावा चोपून काढल्या. फखर झमानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. १४९ धावा आणि ९ विकेट्ससह अष्टपैलू कामगिरी करणारा अराफत मिन्हासला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
