Pakistani Boxer Qudrat Ullah Goes Missing Commonwealth Games 2026: २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ग्लासगो येथे गेलेल्या अनेक देशांतील काही खेळाडू स्पर्धेनंतर बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्पर्धा संपल्यानंतर आपल्या-आपल्या पथकांसह मायदेशी परतण्याऐवजी हे खेळाडू बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.
NBS आणि Pakistan Today या माध्यमांच्या वृत्तांनुसार, एकूण पाच बॉक्सर बेपत्ता असल्याची माहिती आहे. यामध्ये युगांडाचे चार आणि पाकिस्तानचा एक खेळाडू समाविष्ट आहे. युगांडाचे बॉक्सर मंगळवारी संघ मायदेशी परतण्यापूर्वी पथकात सहभागी झाले नाहीत, तर पाकिस्तानी बॉक्सर कुदरत उल्लाह याचा अधिकाऱ्यांनी शोध घेतला असता तो आपल्या खोलीत आढळला नाही. स्कॉटलंडमधील कायदा अंमलबजावणी यंत्रणांना अधिकृत निवासस्थानी राहणाऱ्या काही खेळाडू बेपत्ता झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या प्रकरणाबाबत पोलिस स्कॉटलंडच्या प्रवक्त्याने सांगितलं, “काही खेळाडूंचा संपर्क तुटल्याच्या आणि ते हजर नसल्याच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत. या प्रकरणातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चौकशी सुरू असून, होम ऑफिसशी प्राथमिक स्तरावर समन्वय साधला जात आहे.” युगांडाच्या पथकप्रमुख (Chef de Mission) गॉडविन कयांग्वे यांनी सांगितलं की, पथकातील चार बॉक्सर दोन पुरुष आणि दोन महिला बेपत्ता का झाले, याची त्यांना कोणतीही कल्पना नाही. इब्राहिम केमिस, नुहू बट्टे, एमिली नाकालेमा आणि एंजेल कातुशाबे हे मंगळवारी युगांडाला परत जाणार होते.
बीबीसी स्कॉटलंडशी बोलताना कयांग्वे म्हणाले, “ते मायदेशी परत का गेले नाहीत, याबद्दल मला काहीच माहिती नाही. मात्र त्यांनी आपल्या टीम मॅनेजरशी संपर्क साधून परत येऊ असं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांचे फोन बंद झाले. त्यामुळे त्यांनी निश्चितच शिबिराचे नियम मोडले आहेत, कारण कोणत्याही खेळाडूला परवानगीशिवाय पथक सोडण्याची मुभा नसते. त्यांचे व्हिसा ऑक्टोबरपर्यंत वैध आहेत, त्यामुळे आशा आहे की ते अखेरीस आपल्या देशात परततील.”
दरम्यान, पाकिस्तानी बॉक्सर तर आपला पासपोर्टही न घेता गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा पासपोर्ट टीम मॅनेजरकडे होता. पाकिस्तान बॉक्सिंग महासंघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्या खेळाडूला शेवटचं पहाटे सुमारे २ वाजता हॉटेलच्या खोलीत पाहण्यात आलं होतं. सकाळी ९ वाजता पाकिस्तानला रवाना होण्यासाठी संपूर्ण संघ हॉटेलच्या लॉबीमध्ये जमणार होता, मात्र अधिकाऱ्यांनी त्याच्या खोलीत पाहिलं असता तो तेथे नव्हता.
अशा अनेक घटना पूर्वीपासून घडल्या आहेत
राष्ट्रकुल किंवा ऑलिम्पिक स्पर्धांनंतर खेळाडू बेपत्ता होण्याची ही काही नवीन बाब नाही. २०२२ च्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान दोन बॉक्सर हॉटेलमधून बेपत्ता झाले होते. त्याच वेळी श्रीलंकेच्या पथकातील एक कुस्तीपटू, एक जुडोपटू आणि एक जुडो प्रशिक्षक हे कॉमनवेल्थ गावातून बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती.
२०१८ च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेनंतरही ५० हून अधिक खेळाडू ऑस्ट्रेलियात बेकायदेशीररीत्या थांबले होते, अशी माहिती वृत्तांमध्ये देण्यात आली होती. तसेच, २०२४ च्या वर्ल्ड ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी बॉक्सर झोहेब रशीद याने आपल्या रूममेटची परकीय चलनातील रक्कम आणि मौल्यवान वस्तू घेऊन इटलीतील बुस्टो अर्सिझिओ शहरातून गायब झाल्याची घटना देखील समोर आली होती.
