बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. आता पुढील तीन वर्षांमध्ये राम मंदिराच्या उभारणीचं काम पूर्ण केलं जाणार आहे. सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर पाकिस्तानच्या माजी फिरकीपटूनही हे भूमिपूजन जगातील हिंदूंसाठी ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे.

“आज जगभरातील हिंदूंसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. प्रभू श्रीराम हे आमचे आदर्श आहेत. आम्ही सुरक्षित आहोत आणि आमच्या धर्मावरील विश्वासामुळे कोणाला कोणतीही समस्या उद्भवू नये. प्रभू श्रीराम यांचं जीवन आम्हाला एकता आणि बंधुभावाची शिकवण देतं. जय श्रीराम!,” असं दानिश म्हणाला. त्यानं ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दानिश कनेरिया चर्चेत आला होता. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनं केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याच्या नावाची चर्चा झाली होती. “दानिश कनेरिया हिंदू असल्यामुळे संघातील काही सदस्य त्याच्यासोबत जेवण्यासही विचार करत असतं,” असं तो म्हणाला होता. परंतु त्यानंतर त्यानं आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं माध्यमांसमोर आल्याचंही त्यानं म्हटलं होतं.