ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश टी२० स्पर्धेत स्टीव्हन स्मिथने पाकिस्तानच्या बाबर आझमला एकेरी धाव घेण्यापासून रोखलं. या प्रकाराने बाबर नाराज झाला. बाद झाल्यानंतरही बाबरने आपला राग व्यक्त केला. मात्र पुढच्याच षटकात जे घडलं ते पाहता स्मिथने घेतलेला निर्णय योग्यच होता असं म्हणावा लागेल. दरम्यान बाबरसारख्या अव्वल फलंदाजांवर अविश्वास दाखवून एकेरी धाव घेण्यापासून रोखल्यामुळे स्मिथ तसंच बिग बॅश स्पर्धेवर पाकिस्तानी चाहते टीका करत आहेत.
बिग बॅश स्पर्धेत सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर्स यांच्यात सामना होता. यंदा पहिल्यांदाच बाबर आझम या स्पर्धेत खेळत आहे. बाबरला तूर्तास तरी लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शुक्रवारी झालेल्या लढतीत स्मिथ आणि बाबर यांनी शतकी भागीदारी साकारली. ११व्या षटकात, ख्रिस ग्रीनने तीन निर्धाव चेंडू टाकले. त्यावेळी बाबर ३८ चेंडूत ४७ धावांवर खेळत होता. तीन चेंडूंवर एकही धाव न निघाल्याने बाबरने चौथ्या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. स्टीव्हन स्मिथने बाबरला एकेरी धाव घेण्यापासून रोखलं. कारण एकेरी धाव घेतली असती तर पुढच्या षटकात बाबरला स्ट्राईक मिळाला असता. उर्वरित षटकात फटकेबाजी करून मोठी धावसंख्या रचण्याचे स्मिथचे मनसुबे होते. त्यानुसार त्याच्या संघाने दोन षटकांचा पॉवरप्ले घेतला.
धाव घेण्यापासून रोखल्याने बाबर नाराज झाला. षटकांच्या दरम्यान बाबरने यासंदर्भात स्मिथला विचारलं. स्मिथने कृतीतून उत्तर दिलं. पुढच्याच षटकात स्मिथने रायन हेडलीच्या षटकात ३२ धावा चोपून काढल्या. स्मिथने चार सलग षटकार लगावले. पाचवा चेंडू नोबॉल देण्यात आला, त्यावर स्मिथने चौकार वसूल केला. पुढचा चेंडू वाईड देण्यात आला. पाचव्या चेंडूवर स्मिथला धाव घेता आली नाही. सहाव्या चेंडूवर स्मिथने २ धावा घेतल्या. बिग बॅश स्पर्धेच्या इतिहासात एका षटकात सर्वाधिक धावांचा हा नवा विक्रम आहे.
नॅथन मॅकअँड्यूच्या षटकात बाबरकडे स्ट्राईक होता पण त्याला या संधीचं सोनं करता आलं नाही. नॅथनने पहिल्याच चेंडूवर त्याला बाद केलं. बाबरने ३९ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. बाद होऊन परतताना बाबरने बॅटने बाऊंड्री रेषा भिरकावण्याचा प्रयत्न केला. बाबरची नाराजी टेलिव्हिजन कॅमेऱ्यांनी टिपली.
यासंदर्भात स्मिथला विचारले असता तो म्हणाला, ‘१०व्या षटकानंतर प्रशिक्षक आणि कर्णधाराशी चर्चा झाली. सर्ज पॉवरप्ले लगेच घ्यायचं ठरत होतं. शॉर्ट बाऊंड्रीच्या दिशेने मला फटके खेळायचे होते. पहिलंच षटक मला फुकट घालवायचं नव्हतं. आम्ही त्या षटकात ३२ धावा लुटल्या. माझ्या मते आम्ही योग्यच निर्णय घेतला. एकेरी धाव घेतली नसल्यामुळे बाबर नाराज झाला का मला माहिती नाही.
बिग बॅश स्पर्धेत ‘पॉवर सर्ज’ नावाची संकल्पना आहे. यामध्ये दोन षटकांचा पॉवरप्ले असतो. क्षेत्ररक्षण करणारा संघ ३० गज वर्तुळाच्या बाहेर दोनच क्षेत्ररक्षक तैनात करू शकतो. स्मिथने या सर्जचा फायदा उठवत सलग ४ षटकार लगावले. पाचव्या चेंडूवर त्याने चौकार मारला. स्मिथने ४२ चेंडूत शतकी खेळी साकारली. सिडनी सिक्सर्स संघाने ५ विकेट्सनी हा सामना जिंकला. स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
सिडनी थंडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १८९ धावांची मजल मारली. थंडर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६५ चेंडूत ११० धावांची तडाखेबंद खेळी साकारली. सिक्सर्स संघातर्फे सॅम करनने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्मिथच्या शतकाच्या बळावर सिक्सर्स संघाने १६ चेंडू आणि ५ विकेट्स राखून सामना जिंकला.
