अवघ्या काही दिवसांपूर्वी पासपोर्टही नसलेल्या २१वर्षीय रझाउल्लाने कसोटी पदार्पण तर केलंच पण हे पदार्पण संस्मरणीय ठरेल अशी अद्भुत खेळी साकारली. रझाउल्लाने ९ षटकारांसह ८१ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. बर्मिंगहॅम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा पराभव अटळ होता. मात्र रझाउल्लाने हार मानली नाही. खणखणीत षटकारांच्या बळावर त्याने अर्धशतकी खेळी साकारली. या अर्धशतकाच्या बळावर पाकिस्तानने पिछाडी भरून आघाडी घेतली. रझाउल्लाच्या खेळीमुळे इंग्लंडला विजयासाठी पुन्हा फलंदाजी करावी लागणार आहे.
मी या खेळीचा मनापासून आनंद लुटला. पाकिस्तानचा पराभव लांबवू शकलो आणि इंग्लंडला पुन्हा फलंदाजी करावी लागेल याचं समाधान आहे अशा शब्दांत रझाउल्लाने आपल्या भावना व्यक्त केल्या. रझाउल्लाने ६३ चेंडूत ८१ धावा केल्या. कसोटी पदार्पणात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या टीम साऊदीच्या विक्रमाची रझाउल्लाने बरोबरी केली. २००८ मध्ये न्यूझीलंडच्या टीम साऊदीने नेपियर इथे इंग्लंडविरुद्ध ९ षटकार चोपले होते.
कसोटी पदार्पणात नवव्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक धावा या विक्रमाची रझाउल्लाने बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या कार्बिन बॉशने २०२४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पणात ८१ धावांची खेळी साकारली होती. मी फटके खेळत गेलो. मोठी खेळी करण्याचा माझा प्रयत्न होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी मला षटकार मारायला पूरक अशा टप्प्यावर गोलंदाजी केली. फटकेबाजी करताना माझ्या दोन बॅट तुटल्या. इंग्लंडचं आक्रमण अतिशय दर्जेदार आहे, पण मला भीती वाटली नाही. देशाचं प्रतिनिधित्व करणं हा मोठा सन्मान आहे असं रझाउल्लाने सांगितलं.
रझाउल्लाने मायदेशी पेशावर संघासाठी खेळताना शतकी खेळी साकारली होती. त्या खेळीतून प्रेरणा घेत त्याने इंग्लंडमध्ये दमदार खेळी केली. इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानचा संघ चारीमुंड्या चीत होण्याच्या मार्गावर आहे. दुसऱ्या कसोटीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघात घाऊक बदल केले. ७ खेळाडूंना मायदेशी पाठवण्यात आलं तर दोन प्रशिक्षकांनाही नारळ देण्यात आला. वनडे आणि टी२०चे प्रशिक्षक माईक हेसन यांच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली.
तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा पहिला डाव १३३ धावांतच आटोपला. इंग्लंडने ४५३ धावा करत मोठी आघाडी मिळवली. पाकिस्तानने दुसऱ्या डावात ४४९ धावा करत चांगला प्रतिकार केला. माजी कर्णधार शान मसूदने ९५ धावांची सुरेख खेळी केली. कर्णधार बाबर आझमने ७६ धावा केल्या. सलामीवीर अझान अवेसने ५९ तर मोहम्मद अब्बासने ४२ धावा केल्या. रझाउल्ला-अब्बास जोडीने ९व्या विकेटसाठी १२१ धावांची शानदार भागीदारी रचली. डॅन लॉरेन्सने रझाउल्लाची खेळी संपुष्टात आणली. इंग्लंडतर्फे गस अॅटकिन्सनने ३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडला विजयासाठी १३० धावा करायच्या आहेत.
