भारताचा अव्वल स्नूकरपटू पंकज अडवाणीने पुन्हा एकदा विश्वविजेतेपदाचा मान पटकावला आहे. कराचीत झालेल्या जागतिक ६-रेड स्नूकर अजिंक्यपद स्पध्रेत त्याने जेतेपद कायम राखताना १३वे जागतिक जेतेपद नावावर केले. गतविजेत्या पंकजने चीनच्या यान बिंगटाओचा ६-२ असा सहज पराभव केला.
‘‘जेतेपद कायम राखण्यात यश मिळवण्याचा आनंद निराळाच असतो. स्नूकर अनिश्चिततेचा खेळ आहे. अंतिम फेरीत पोहोचेन असे वाटलेही नव्हते. या स्पध्रेत नवीन काही तरी शिकायला मिळेल आणि त्याचा पुढील वर्षी होणाऱ्या व्यावसायिक स्पर्धामध्ये फायदा होईल या उद्देशाने येथे दाखल झालो होतो,’’ असे मत पंकजने व्यक्त केले.
पंकजने बेस्ट ऑफ ११ फेरींच्या अंतिम लढतीत ३-० अशी आघाडी घेताना यानवर दडपण निर्माण केले होते, परंतु चीनच्या या खेळाडूला पुढील दोन फ्रेममध्ये सूर गवसला. त्याच्या या पुनरागमनामुळे सामना ३-२ असा अटीतटीचा झाला. या चुरशीच्या परिस्थितीत पंकजने सर्वोत्तम खेळ करताना प्रतिस्पर्धी खेळाडूला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. त्याने पुढील दोन्ही फ्रेमध्ये यानला एकही गुण कमवण्याची संधी न देता ५-२ अशी भक्कम आघाडी घेतली.
सातव्या फ्रेममध्ये त्याने ७१ गुणांचा ब्रेक केला. या आघाडीनंतर यान मात्र हलबल झाला आणि पंकजने आठव्या फ्रेममध्येही बाजी मारून जेतेपद कायम राखले.

अंतिम लढत
पंकज अडवाणी  विजयी वि. यान बिंगटाओ
६-२ : ३७-२१, ५७ (३०)-०, ३२-२९, ०-६६(६६), ६-३८(३७), ४८-०, ७५(७१)-०, ४०(३५)-२८.