पंकजने २००६मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पटकावलेले सुवर्णपदक मला समर्पित केले होते. तिथूनच क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ म्हणून माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. सर्वस्वी वेगळ्या, मात्र निर्णायक ठरू शकणाऱ्या क्षेत्रात वाटचाल करण्यासाठी पंकजनेच मला प्रोत्साहन दिले. क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ म्हणून मी त्याला सल्ला देतो. मात्र प्रत्यक्षात आम्ही एकमेकांच्या कारकिर्दीला आकार दिला, असे म्हणणे उचित ठरेल, अशा शब्दांत बिलियर्ड्स विश्वविजेता पंकज अडवाणीचा भाऊ आणि नामवंत क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ श्री अडवाणीने आपला प्रवास उलगडला.
*पंकजला स्नूकर आणि बिलियर्डसशी ओळख तू करून दिलीस?
बंगळुरूला आमच्या घरापासून जवळच स्नूकर केंद्र होते. शाळा संपल्यानंतर अभ्यास आटोपून मी तिथे खेळायला जात असे. माझ्यात आणि पंकजमध्ये सात वर्षांचे अंतर आहे. मी संध्याकाळी कुठे तरी गायब होतो हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिथे येण्यासाठी हट्ट धरला. मी जेव्हा त्याला तिथे घेऊन गेलो, तेव्हा तो भारावून गेला. हे सगळे आवडल्याचे त्याच्या डोळ्यांत दिसत होते. मग तो रोज माझ्यासोबत येऊ लागला आणि सहा महिन्यांतच त्याने खेळण्याची इच्छा प्रदर्शित केली. तिथे खेळणाऱ्यांच्या तुलनेत त्याचे वय आणि उंची लहान होती; पण त्याचा पहिला प्रयत्नच अचंबित करणारा होता. इतके दिवस हे सर्व पाहणारा लहान मुलगा निरीक्षणातून एवढे चांगले खेळू शकतो, याचे सर्वाना आश्चर्य वाटले. मग काही दिवसांतच दिग्गज स्नूकरपटू अरविंद सुव्यर यांनी पंकजचा खेळ पाहिला आणि त्याला मार्गदर्शन करायचे ठरवले
*यानंतर अभ्यास आणि खेळ यांचा समतोल पंकजने कसा साधला?
पंकजला या खेळाची आवड नाही, वेड आहे; परंतु त्यासाठी त्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. शाळेचा आणि नंतर महाविद्यालयाचा अभ्यास पूर्ण केल्यावर तो खेळण्यासाठी धाव घेत असे. तासन्तास सरावाला तो कधी कंटाळला नाही. जिल्हा-राज्यस्तरीय स्पर्धामध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर तो राष्ट्रीय स्तरावर चमकू लागला. त्याची आकलन क्षमता अपवादात्मक आहे. सराव, स्पर्धा आणि अभ्यास या तिन्ही आघाडय़ांना तो न्याय देत असे. असे असल्यामुळेच त्याने या खेळातच कारकीर्द करणार असल्याच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा दिला.
*तू खेळातली कारकीर्द थांबवून क्रीडा मानसशास्त्राकडे वळलास आणि पंकजचा मार्गदर्शक झालास, हे स्थित्यंतर कसे घडले?
मी बिलियर्डस खेळायचो, परंतु स्पर्धात्मक पातळीवर खेळलो नाही. ‘कॉर्पोरेट ट्रेनर’ म्हणून मी ऑस्ट्रेलियात काम करत होतो. दोहाच्या आशियाई स्पर्धेसाठी पंकजची तयारी करत होता. त्या वेळी कामानिमित्ताने बंगळुरूला आलो असताना खेळातील तांत्रिक गोष्टींत पंकज सज्ज होता, मात्र मानसिकदृष्टय़ा सक्षम वाटला नाही. त्या वेळी मी त्याला मानसिक कणखरतेसाठी काही व्यायाम सांगितले. काही गोष्टींवर आम्ही चर्चा केली. त्याच्या अडचणी जाणून घेत दडपणाच्या क्षणी खेळ उंचावण्यासाठी काय करता येईल, या संदर्भात क्लृप्त्या सांगितल्या. त्यानंतर काही दिवसांत दोहाला मिळवलेले सुवर्णपदक त्याने मला समर्पित केले. तोपर्यंत क्रीडा मानसशास्त्राचा मी शास्त्रोक्त अभ्यास केला नव्हता. सल्ला देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी घरचा माणूस असणे केव्हाही सोयीचे ठरते, हे आम्हाला दोघांनाही पटले. क्रीडा मानसशास्त्राचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा पंकजनेच दिली. आपला अभ्यास केवळ पंकजला नव्हे, तर अन्य क्रीडापटूंना उपयुक्त ठरू शकतो, हे लक्षात आल्यानंतर सखोल शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेलो. पंकज सहा वर्षांचा असतानाच आमच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे मी त्याच्यासाठी वडिलांसमान आहे. एक भाऊ, मित्र आणि व्यावसायिक क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ म्हणून मी त्याला समजून घेऊ शकतो. त्यामुळे त्याचा सल्लागार मार्गदर्शक होण्याचा निर्णय घेतला.
*पंकजच्या नावावर २९व्या वर्षी बारा विश्वविजेतेपदे आहेत. वेळ आणि गुण दोन्ही प्रकारांत जगज्जेतेपदाची त्याने हॅट्ट्रिक साधली. अल्पवयातच एवढी भरारी घेण्यामागचे रहस्य काय?
पंकज खूप चांगला विद्यार्थी आहे आणि त्याची आकलनक्षमता अफाट आहे. त्याचबरोबर दडपण हाताळण्याचे त्याचे कौशल्य विलक्षण आहे. साधारणत: खेळाडू स्नूकर आणि बिलियर्डस एकाच खेळाचे विशेषज्ञ असतात. मात्र पंकजचे दोन्ही प्रकारांत प्रभुत्व आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे भरगच्च वेळापत्रक जपत पंकजची दोन्ही खेळांसाठी तारेवरची कसरत चालू आहे, मात्र त्याची खेळाची आवड थक्क करणारी आहे. बहुतांशी खेळाडू यशानंतर, जेतेपदानंतर आनंदी असतात. पंकजचे तसे नाही. क्षमतेनुरूप खेळ केल्यावरच तो आनंदी असतो. यश मिळवूनही त्याचे पाय जमिनीवर असतात. त्याच्यातील नम्रपणामुळेच तो आतापर्यंत एवढे यश मिळवू शकला आहे. त्याच्या या वाटचालीत माझा खारीचा वाटा आहे, याचा आनंद वाटतो.