रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावू शकतील अशा खेळाडूंसाठी क्रीडा मंत्रालयाने लक्ष्य ऑलिम्पिक योजना तयार केली आहे. मात्र ही योजना पक्षपाती आहे. या योजनेत काही खेळांना झुकते माप देण्यात आले आहे तर काही खेळ दुर्लक्षितच राहिले आहेत, अशी टीका अव्वल बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणीने काढले. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताला दमदार वाटचाल करायची असेल तर विविध खेळांना समान वागणूक मिळायली हवी, असे त्याने पुढे सांगितले.
‘ऑलिम्पिक, आशियाई तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धापुरते आपले क्रीडाविश्व मर्यादित झाले आहे. या स्पर्धा निश्चितच मोठय़ा आहेत, दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धामध्ये पदक मिळवणे गौरवास्पद असते मात्र क्रीडाविश्व त्यापल्याडही आहे. सरकारद्वारे खेळ आणि खेळाडूंना साहाय्य मिळत असेल तर ते विशिष्ट स्पर्धा केंद्रित असू नये,’ असे पंकजने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘बहुतांशी खेळांमध्ये आपले खेळाडू आघाडीवर आहेत. आपल्या खेळाचा दर्जा सातत्याने सुधारत आहे. असंख्य युवा खेळाडू खेळांचा कारकीर्द म्हणून विचार करीत आहेत. अशा वेळी प्रत्येक खेळाला मदत मिळायला हवी. बिलियर्ड्स किंवा स्नूकर लक्ष्य ऑलिम्पिक योजनेचा भाग नाही म्हणून मी हे म्हणत नाहीये. ऑलिम्पिकसाठी तयारी करणाऱ्या क्रीडापटूंना आर्थिक साहाय्य मिळणे सकारात्मक गोष्ट आहे. माझा या गोष्टीला आक्षेप नाही. मात्र अन्य खेळांचाही प्राधान्याने विचार व्हावा. देशासाठी खेळणे, जिंकणे हे प्रत्येक क्रीडापटूसाठी अभिमानास्पद गोष्ट असते. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी क्रीडापटूने असंख्य गोष्टींचा त्याग केलेला असतो. म्हणून स्पर्धापुरते मर्यादित होऊन खेळांचा विचार व्हायला नको.
क्रीडा धोरणाविषयी विचारले असता पंकज म्हणाला, ‘क्रीडा धोरणात खेळाडू केंद्रस्थानी असायला हवा. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे तसे होत नाही.प्रशासकांनी खेळाडूंची बाजूही समजून घ्यायला हवी. खेळाडू घडवायचे असतील तर खेळाडूंचे लक्ष खेळावर राहील, अन्य गोष्टींमध्ये त्यांचा वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.’