वृत्तसंस्था, नागोया

पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेतील काही खेळांना यापूर्वीच सुरुवात झाली असली, तरी स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा आज, रविवारी होणार आहे. यंदा भारतीय खेळाडूंची संख्या कमी असली, तरी त्यांचा उत्साह कायम असून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

भारताने २०२३ मध्ये हांगझो येथे झालेल्या स्पर्धेत २९ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ५१ कांस्य अशी एकूण १११ पदके जिंकून पाचवे स्थान पटकावले होते. ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. त्या वेळी भारताचे ३०३ खेळाडू स्पर्धेत उतरले होते. यंदा ११ क्रीडा प्रकारांत केवळ १६८ खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. सहभागाचा कोटा कमी झाल्याने आणि काही स्पर्धा रद्द झाल्याने खेळाडूंची संख्या घटली आहे. त्यामुळे यंदा पदकांची संख्या कायम राखणेही आव्हानात्मक ठरणार आहे. अनुभवी आणि नामांकित पदकविजेत्यांच्या कामगिरीसह नवोदित खेळाडूंवर भारताचे यश अवलंबून असेल.

मानसी-तुलसिमती उपांत्य फेरीत

बॅडमिंटनमधील मानसी जोशी आणि थुलसिमती मुरुगेसन या जोडीने शनिवारी पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताचे पहिले पदक निश्चित केले. २०२३च्या हांगझो स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेल्या या जोडीने चीनच्या युएमेई लिऊ आणि टोंगतोंग ली यांचा २१-१०, २१-१७ असा पराभव केला.