पदकधडाका कायम!

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील दोन दिवस पदकविरहित गेल्यानंतर शुक्रवारी भारताने पुन्हा तीन पदकांच्या धडाक्यासह पदकसंख्या १३ पर्यंत नेली आहे.

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील दोन दिवस पदकविरहित गेल्यानंतर शुक्रवारी भारताने पुन्हा तीन पदकांच्या धडाक्यासह पदकसंख्या १३ पर्यंत नेली आहे. नेमबाजीत कांस्यपदक जिंकून सुवर्णकन्या अवनी लेखारा पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली महिला क्रीडापटू ठरली. अ‍ॅथलेटिक्समधील पदकवर्षांव कायम राखताना उंच उडीपटू प्रवीण कुमारने रौप्यपदक जिंकले, तर हरविंदर सिंगने कांस्यपदकासह तिरंदाजीमधील पहिल्या पदकाची नोंद केली.

हरविंदरला कांस्य

टोक्यो : भारतीय रीकव्‍‌र्ह तिरंदाज हरविंदर सिंगने शुक्रवारी कोरियाच्या किम मिन सू याच्यावर ६-५ असा रोमहर्षक विजय मिळवून कांस्यपदकाची नोंद केली. पॅरालिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाजाने मिळवलेले हे पहिले पदक ठरले.

जागतिक क्रमवारीत २३व्या क्रमांकावर असलेल्या हरविंदरने २०१८च्या आशियाई पॅरा-क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते. कांस्यपदकाच्या लढतीत ३१ वर्षीय हरविंदरने ५-३ अशी आघाडी घेतली होती, परंतु किमने पाचव्या सेटमध्ये १० गुण मिळवल्यानंतर बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी झालेल्या फेरीत हरविंदरने १०-८ अशा फरकाने सामना खिशात घातला.

हरयाणाच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील हरविंदर दीड वर्षांचा असताना त्याला डेंग्यू झाला होता. परंतु स्थानिक डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनचा प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे त्याचे पाय निकामी झाले. मग २०१२चे लंडन ऑलिम्पिक पाहून तिरंदाजी खेळण्याची प्रेरणा घेणाऱ्या हरविंदरच्या वडिलांनी आपल्या शेतातच मुलासाठी तिरंदाजी केंद्र तयार केले. याच ठिकाणी त्याने सराव केला. खेळाव्यतिरिक्त पतियाळाच्या पंजाबी विद्यापीठातून हरविंदरने अर्थशास्त्र विषयात पीएच.डी.सुद्धा मिळवली आहे.

प्रवीणला उंच उडीत रौप्य

पीटीआय, टोक्यो

भारताच्या प्रवीण कुमारने पॅरालिम्पिक स्पर्धेमधील पदार्पणात पुरुषांच्या उंच उडी क्रीडा प्रकारात (टी६४) शुक्रव्रारी रौप्यपदकावर नाव कोरले.

१८ वर्षीय प्रवीणने २.०७ मीटर अंतरावर उडी घेत दुसऱ्या क्रमांकासह आशियाई विक्रमसुद्धा प्रस्थापित केला. ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने २.१० मीटर अंतरासह सुवर्णपदक पटकावले. रिओ पॅरालिम्पिकमधील विजेत्या पोलंडच्या मॅसिएज लीपिआटोने (२.०४ मीटर) कांस्यपद मिळवले.

२०१९मध्ये उंच उडी क्रीडा प्रकाराची निवड केल्यापासून हे प्रवीणचे पहिलेच प्रतिष्ठेचे पदक ठरले. याच वर्षी जागतिक कनिष्ठ पॅरा-अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्यपदक कमावले होते.  याशिवाय वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीचीही नोंद केली. नोएडावासी प्रवीण हा भारताचा सर्वात युवा पदकविजेता ठरला आहे.

माझ्या भावना व्यक्त करणे अवघड आहे. परंतु मी या यशाचे श्रेय प्रशिक्षकांना देईन. स्पर्धेआधी प्रचंड दडपण जाणवत होते. परंतु दोन मीटर अंतरावर उडी घेतल्यावर आत्मविश्वास उंचावला. पॅरालिम्पिक स्पर्धेमधील पहिल्याच प्रयत्नातील ही उडी आनंददायी होती.

-प्रवीण कुमार

अवनीचे ऐतिहासिक यश

टोक्यो : नेमबाज अवनी लेखारा पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी भारताची पहिली महिला क्रीडापटू ठरली. तिने शुक्रवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन एसएच १ क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले.

१९ वर्षीय अवनीने ५१ वेळा १० गुणांची कमाई करीत ११७६ गुणांसह पात्रता फेरीचा अडथळा ओलांडला. मग अंतिम फेरीत तिने ४४५.९ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. चीनच्या झँग क्युईपिंगने (४५७.९ गुण) सुवर्णपदक पटकावले, तर जर्मनीच्या नताशचा हिल्ट्रॉपने (४५७.१ गुण) रौप्यपदक पटकावले.

जयपूरस्थित अवनीला २०१२मध्ये झालेल्या अपघातात अपंगत्व आले. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राचे आत्मचरित्र अवनीला तिच्या वडिलांनी भेट दिले होते. त्यातून प्रेरणा घेत २०१५पासून तिने जयपूर नेमबाजी केंद्रावर नेमबाजीला प्रारंभ केला.

यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये अवनीने विश्वविक्रमाची बरोबरी करणारे २४९.६ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. परॉलिम्पिकमधील नव्या विक्रमाचीही तिने नोंद या कामगिरीने केली होती.

३ पॅरालिम्पिकमध्ये दोन किंवा अधिक पदके जिंकणारी अवनी तिसरी भारतीय क्रीडापटू ठरली आहे. १९८४च्या पॅरालिम्पिकमध्ये जोगिंदर सिंग सोधीने एक रौप्य (गोळाफेक) आणि दोन कांस्यपदके (थाळीफेक, भालाफेक) जिंकली. मग भालाफेकपटू देवेंद्र झझारियाने दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावले आहे.

  टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा

माझी स्वत:कडून यापेक्षा उत्तम कामगिरीची अपेक्षा होती. अंतिम फेरी आव्हानात्मक होती. परंतु मी सर्वोत्तम प्रयत्न केले. त्यामुळे कांस्यपदक मिळवल्याचा आनंद होत आहे. पहिल्याच पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकल्याची अनुभूती भारावणारी आहे. गेले काही महिने केलेल्या मेहनतीचे चीज झाले आहे.

-अवनी लेखारा

प्रमोद-पलक जोडीसह सुहास, तरुण, मनोज उपांत्य फेरीत

टोक्यो : प्रमोद भगत आणि पलक कोहली या भारतीय जोडीने शुक्रवारी मिश्र बॅडमिंटन क्रीडा प्रकाराची उपांत्य फेरी गाठली आहे. याशिवाय पुरुष एकेरीत सुहास यथिराज, तरुण ढिल्लाँ आणि मनोज सरकार यांनीही अंतिम चौघांमध्ये स्थान मिळवले आहे. प्रमोद-पलक जोडीने थायलंडच्या सिरिपाँग टीमारोम आणि निपाडा सीनसुपा जोडीचा २९ मिनिटांत २१-१५, २१-९ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील सुहासने इंडोनेशियाच्या हॅरी सुसांतोला २१-६, २१-१२ असे नमवले, तर तरुणने कोरियाच्या शिन क्युंग वानवर २१-१८, १५-२१, २१-१७ असा विजय मिळवला. मनोजने युक्रेनच्या ऑलीक्सँडर चिर्कोव्हला २१-१६, २१-९ असे हरवले. महिला दुहेरीत परुल परमार आणि पलक जोडीने सलग दुसरा पराभव पत्करला. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतही पलकच्या पदरी निराशा पडली.

गोळाफेक

सोमन राणा चौथा

टोक्यो : भारताच्या सोमण राणाला पुरुषांच्या गोळाफेक (एफ ५७) क्रीडा प्रकारात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांमध्ये कशिश लाक्रा आणि एकता भायानला अनुक्रमे सहावे आणि आठवे स्थान मिळाले. ३८ वर्षीय सोमणने पहिल्याच प्रयत्नात १३.८१ मीटर अंतर ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

कॅनोई

प्राचीला अखेरचे स्थान

टोक्यो : भारताच्या प्राची यादवला कॅनोई क्रीडा प्रकारात पदक जिंकण्यात अपयश आले. महिलांच्या २०० मीटर व्हा एकेरी स्पर्धेत तिला आठवे आणि अखेरचे स्थान मिळाले. तिने १:०७.३२९ सेकंदांत शर्यत पूर्ण केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Paralympic games medals tokyo ssh