कर्नाटक आणि जम्मू काश्मीर यांच्यादरम्यान सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळाडूंदरम्यान वादावादी पाहायला मिळाली. जम्मू काश्मीरचा कर्णधार पारस डोगरा कर्नाटकचा बदली खेळाडू के.व्ही.अनीशच्या दिशेने धावून गेला. फॉरवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करणाऱ्या अनीशनच्या हेल्मेटला हेल्मेट भिडवून पारसने प्रत्युत्तर दिलं. कर्नाटकचा कर्णधार मयांक अगरवाल आणि के.एल.राहुल यांनी पारसला रोखलं. पंचांनी मध्यस्थी करत दोघांना बाजूला केलं.

जम्मू काश्मीरचा संघ पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळतो आहे. जेतेपदाच्या दृष्टीने त्यांची जोरदार वाटचाल सुरू आहे. हुबळी इथे सुरू असलेल्या या लढतीत दुसऱ्या दिवशी खेळाडूंमध्ये बाचाबाचीचा प्रसंग घडला. १०१व्या षटकादरम्यान जम्मू काश्मीरचे पारस डोगरा आणि कन्हैया वाधवान खेळत होते. त्यांची भागीदारी बहरत होती. प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर पारस डोगराचा झेल उडाला मात्र चेंडू चौकार गेला. यानंतर फॉरवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करणारा के.अनीश पारसला उद्देशून काहीतरी बोलला. ते ऐकून पारसने अनीशच्या दिशेने धाव घेतली. हेडबट अर्थात हेल्मेट अनीशच्या हेल्मेटला भिडवून जाब विचारला. परिस्थिती हाताबाहेर जाणार लक्षात येताच कर्नाटकच्या संघातील वरिष्ठ खेळाडू मयांक अगरवाल, के.एल राहुल यांनी दोघांना अडवलं. पंचांनी तातडीने दोघांना बाजूला करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अनीश फॉरवर्ड शॉर्टलेगला क्षेत्ररक्षण करत असताना सातत्याने पारसला उसकवण्याचा प्रयत्न करत होता.

षटक संपल्यानंतर पारसने अनीशची माफी मागितली मात्र त्याने त्याचं ऐकण्यास नकार दिला. यावेळी मयांक आणि राहुल यांनी पारसला उद्देशून शेरेबाजी केली. दरम्यान पहिल्या दिवशीच्या खेळादरम्यान व्यशकचा चेंडू लागल्यामुळे पारसला मैदान सोडावे लागले होते.

जम्मू काश्मीरला पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे. टॉस जिंकून बॅटिंग घेतलेल्या जम्मू काश्मीरने पाचशेपल्याड धावसंख्या नोंदवत दमदार वाटचाल केली आहे. पारसने ७० धावांची खेळी केली. ४१वर्षीय पारस हा डोमेस्टिक क्रिकेटमधल्या अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. १५२ सामन्यांमध्ये १०,५१७ धावा त्याच्या नावावर आहेत. यामध्ये ३४ शतकं आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेश संघाचा आधारवड असलेल्या पारसने अलीकडे काश्मीर संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पारसचा अनुभव काश्मीर संघासाठी मोलाचा ठरला आहे.