जम्मू काश्मीर संघाचा कर्णधार पारस डोगराने सोमवारी रणजी करंडक स्पर्धेत ऐतिहासिक विक्रम नावावर केला. देशातल्या सगळ्यात प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेत १०,००० धावांचा टप्पा ओलांडणारा पारस केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. कल्याणी इथे सुरू असलेल्या जम्मू काश्मीर आणि बंगाल यांच्यातील रणजी करंडक स्पर्धेच्या सेमी फायनलच्या लढतीत पारसने हा विक्रम नावावर केला. रणजी स्पर्धेत १०,००० धावा करणारा अन्य फलंदाज म्हणजे वासिम जाफर.
१४७व्या डावात पारसने १०,००० धावांचा टप्पा पार केला. रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम वासिम जाफरच्याच (१२,०३८) नावावर आहे. ४१वर्षीय पारस रणजी स्पर्धेत सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्यांच्या यादीत ३३ शतकांसह द्वितीय स्थानी आहे. या यादीतही वासिम जाफर ४१ शतकांसह अव्वल स्थानी आहे.
जम्मू काश्मीरचा संघ १३/२ अशा स्थितीत असताना पारस खेळायला उतरला. थोड्या वेळात शुभम पुंडीरही बाद झाला. मात्र पारसने अब्दुल समदच्या साथीने ५० धावांची भागीदारी साकारली. ११वी धाव घेताच पारसने रणजी करंडक स्पर्धेत १०,००० धावांचा टप्पा ओलांडला. रणजी करंडक स्पर्धेच्या ९२ वर्षांच्या इतिहासात हा टप्पा ओलांडणारा तो केवळ दुसरा फलंदाज आहे.
२००१ मध्ये पारसने हिमाचल प्रदेशकडून खेळायला सुरुवात केली. हिमाचल प्रदेशसाठी त्याने ९५ रणजी सामने खेळताना ६४१८ धावा केल्या. यामध्ये १९ शतकं आणि २४ अर्धशतकांचा समावेश होता. २०१८ मध्ये त्याने पुदुच्चेरीकडून खेळण्याचा निर्णय घेतला. पुदुच्चेरीचा तो पहिलावहिला शतकवीर ठरला. पाच हंगामात पुदुच्चेरीचं प्रतिनिधित्व करताना त्याने ११ शतकं झळकावली. २०२४-२५ हंगामावेळी त्याने जम्मू काश्मीरकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याच्याकडे संघाचं कर्णधारपदही सोपवण्यात आलं.
यंदाच्या हंगामात पारस ५०० धावांचा टप्पा ओलांडण्याची चिन्हं आहेत. जम्मू काश्मीर संघाने पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली. यात पारसच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. पारसने आपल्या बॅटिंगसह संघासमोर दमदार उदाहरण ठेवलं.
रणजी स्पर्धेचे सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीतही पारस दुसऱ्या स्थानी आहे. पारसचा हा १४७वा रणजी सामना आहे. वासिम जाफर १५६ सामन्यांसह अव्वल स्थानी आहे.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पारसच्या नावावर १५,०००हून अधिक धावा आहेत. भारत अ संघासाठी तो एकमेव सामना खेळला आहे. नॉर्थ झोन संघांचही त्याने प्रतिनिधित्व केलं आहे.
दरम्यान रणजी करंडक स्पर्धेच्या सेमी फायनलच्या लढतीत बंगालने ३२८ धावा केल्या. सुदीप कुमार घरमीने १४६ धावांची खेळी केली. जम्मू काश्मीरतर्फे आक्विब नबीने ५ विकेट्स पटकावल्या. सुनील कुमारने ३ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. जम्मू काश्मीरच्या दुसऱ्या दिवसअखेर १९८/५ धावा झाल्या आहेत. जम्मू काश्मीरचा संघ १३० धावांनी पिछाडीवर आहे. पारसने ५८ धावांची खेळी केली.

