भारत ‘अ’ आणि अंडर-१९ संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलणारे माजी गोलंदाज पारस म्हांब्रे यांनी भारताच्या वरिष्ठ संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली. म्हांब्रे जवळपास एक दशकापासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीशी संबंधित आहेत आणि त्यांना राहुल द्रविडचे जवळचे मानले जाते. द्रविड हा भारतीय संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक असू शकतो.

न्यूज १८च्या वृत्तानुसार बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “पारस यांनी आज या पदासाठी अर्ज केला. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर आहे. पारस यांना खूप अनुभव आहे आणि ते गेल्या दशकभरापासून भारतीय क्रिकेटच्या एलिट कोचिंग पद्धतीचा एक भाग आहेत.”

हेही वाचा – IPL 2022: थोड्याच वेळात होणार दोन नवीन संघांची घोषणा; ‘ही’ दोन शहरं आघाडीवर

बीसीसीआयचा असा विश्वास आहे, की सध्याच्या वेगवान गोलंदाजांनंतर पुढील गोलंदाजांची फळी निर्माण करण्यात म्हाम्ब्रे योगदान देतील. टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्रींचा कार्यकाळ संपत आहे.

म्हाम्ब्रे यांची कारकीर्द

म्हाम्ब्रे यांच्या अर्जाचा अर्थ असा, की त्यांच्या कोअर टीममधील सदस्यांना भारतीय संघासोबत काम करण्यात रस आहे. म्हाम्ब्रे यांनी १९९६ ते १९९८ दरम्यान भारतासाठी दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी मुंबईसाठी ९१ प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात २८४ बळी घेतले आहेत. रणजी करंडक स्पर्धेत ते बंगाल आणि बडोदाचे प्रशिक्षक राहिले आहेत.