Paris Olympics 2024 Day 10 Highlights: पॅरिस ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशीही भारताच्या पदकसंख्येत कोणतीही वाढ झाली नाही. सोमवारी भारताच्या हातातून दोन पदकं निसटली. भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनकडून पदकाची अपेक्षा होती पण त्याला चांगल्या खेळीनंतरही पराभव पत्करावा लागला.. कांस्यपदकाच्या लढतीत त्याला मलेशियाच्या ली जी जियाने पराभूत केले. नेमबाजीत महेश्वरी चौहान आणि अनंतजित सिंग नारुका या जोडीला स्कीट मिक्स सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत १ गुणाने चीनकडून पराभव पत्करावा लागला. कुस्तीपटू निशा दहियाच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे आघाडी घेतल्यानंतरही महिलांच्या ६८ किलो वजनी गटातील कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला उत्तर कोरियाच्या पाक सोल गमकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला टेबल टेनिस संघाने रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर भारताचा धावपटू अविनाश साबळेने ३००० मी. अडथळा शर्यतीत अंतिम फेरी गाठली आहे. पॅरिसमध्ये भारताने आतापर्यंत केवळ तीन पदके जिंकली आहेत.