2024 Paris Olympic Day 14 Highlights: पॅरिस ऑलिम्पिकचा आज ९ ऑगस्टला भारताने सहावं ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे. भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतने कुस्तीत यंदाच्या ऑलिम्पिकमधील पदक जिंकत परंपरा कायम ठेवली. १३व्या दिवशी भारताने दोन पदकं जिंकली होती. भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक तर गोल्डन बॉय नीरज चोप्राने रौप्यपदकाला गवसणी घातली. आता यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताची ६पदकं झाली आहेत. याशिवाय, महिला आणि पुरुषांच्या ४x४०० रिलेचे हीट होते. पण दोन्ही संघांना पुढील फेरीत स्थान मिळवणे शक्य झाले नाही.

याशिवाय अतिरिक्त वजनामुळे भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर विनेशने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादामध्ये तिला रौप्यपदक मिळावे अशी तिने याचिका दाखल केली. यासंबंधित ऑलिम्पिक संपेपर्यंत निर्णय देऊ असे क्रीडा लवादाने निवेदन जारी करत सांगितले आहे.

Live Updates

India at Paris Olympic 2024 Day 14 Highlights: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या १४व्या दिवसाचे हायलाईट्स

23:22 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: अमन सेहरावतची कांस्यपदकाला गवसणी

भारताच्या २१ वर्षीय अमन सेहरावतने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कुस्तीमधील पहिलं पदक मिळवून दिलं. अमनने कांस्यपदकाची लढत १३-५ अशा फरकाने म्हणजेच ८ गुणांच्या मोठ्या फरकाने जिंकली आहे. यासह अमनने भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधील सहावं पदक जिंकवून दिलं आहे.

23:10 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: अमन सेहरावत

भारताला सहावं पदकं मिळवून देण्यासाठी अमन सेहरावत कुस्तीच्या मॅटवर पोहोचला आहे. अमन सेहरावतने १ गुण देत नंतर २ गुण पटकावत आघाडी घेतली आहे.

22:57 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: अमन सेहरावत

भारताला यंदा कुस्तीमध्ये एकही पदक मिळालं नाहीय, असं कधी झालं नाही की भारताने ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमधील पदक गमावलं आहे. आज पवन सेहरावतकडून भारताला कुस्तीमध्ये एक पदक जिंकण्याची संधी आहे. काहीच वेळात पवनचा सामना सुरू होणार आहे.

21:49 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Medal Tally: भारतीय संघ पदकतालिकेत कितव्या स्थानी

Paris Olympics 2024 Medal Tally: फक्त १ पदक जिंकून पाकिस्तान भारतापेक्षा ११ स्थान पुढे कसा काय? मेडलनुसार देशांची रँकिंग कशी ठरवतात, जाणून घ्या
21:05 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: सुवर्णपदक विजेत्या अर्शद नदीमवर पैशांचा पाऊस

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकणाऱ्या भालाफेकपटू अर्शद नदीमला १० कोटी (पाकिस्तानी) रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. काही महिन्यांपूर्वी नदीमला ऑलिम्पिकसाठी नवीन भाला खरेदी करण्यासाठी ‘क्राउड फंडिंग’ (मोठ्या संख्येने लोकांकडून पैसे गोळा करणे) ची मदत घ्यावी लागली होती.

20:09 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारताला सहाव्या पदकाची प्रतिक्षा

भारताला आज १४व्या दिवशी सहावं पदक जिंकण्याची संधी आहे. भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत ५७ किलो वजनी गटात कांस्यपदकाचा सामना खेळणार आहे. त्याचा सामना पोर्टो रिकोच्या डॅरियन क्रूझ याच्याविरूद्ध होणार आहे. हा सामना रात्री १०.४५ वाजता खेळवला जाईल.

18:33 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live:महिला एकेरी गोल्फ स्पर्धा

दिक्षा डागर आणि अदिती अशोक पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या महिला एकेरी गोल्फ स्पर्धेत उतरल्या आहेत. दोन्ही खेळाडूंनी दमदार सुरुवात केली असून अव्वल स्थानावर पोहोचण्यासाठी चांगली कामगिरी करत आहेत.

18:32 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: विनेश फोगटवर सचिन तेंडुलकरचे मोठे वक्तव्य

सचिन तेंडुलकरने विनेश फोगटच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर करत ती रौप्यपदकाची हकदार असल्याचे म्हटले आहे.

वाचा सविस्तर बातमी

“हे खेळभावनेच्या विरूद्ध आहे, तिने…” विनेशच्या पदकासाठी मास्टर ब्लास्टर सरसावला, म्हणाला ‘अंपायर्स कॉल असायला हवा’
17:20 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: महिला आणि पुरूष रिले संघ अंतिम फेरी गाठण्यात अपयशी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी ४x४०० मी पुरुष रिले स्पर्धेत भारतीय संघ हिट शर्यतीत (प्राथमिक शर्यत) एकूण १०व्या स्थानावर राहून अंतिम फेरीत स्थान गमावले. महिलांचा ४x४०० मीटर रिले संघ देखील पहिल्या फेरीतील हीटमध्ये १६ सहभागी राष्ट्रांमध्ये १५व्या स्थानावर राहून पात्र ठरू शकला नाही. विथ्या रामराज, ज्योतिका श्री दांडी, एमआर पूवम्मा आणि शुभा वेंकटेशन यांच्या चौकडीने ४:३२.५१ अशी वेळ नोंदवली आणि एकूण १५वे स्थान मिळवून हीट दोनमध्ये आठव्या आणि शेवटच्या स्थानावर राहिले.

16:37 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: विनेश फोगट सुनावणी

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील विनेश फोगटच्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अतिरिक्त वजनामुळे तिला ५० किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात खेळण्यापूर्वीच अपात्र ठरवले होते. विनेशने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादात याचिका दाखल केली असून, तिच्या पदकाबाबत निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. CAS ने निवेदन जारी करून प्रकरणाची सुनावणी पॅरिस ऑलिम्पिक संपण्यापूर्वी होणार असल्याचे सांगितले आहे.

वाचा सविस्तर बातमी – विनेश फोगटला पदक मिळणार की नाही? याचिकेसंदर्भात आली नवी अपडेट…

15:48 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: पुरुषांची ४x४०० मीटर रिले

भारताचे मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अमोज जेकब, राजेश रमेश ३:००.५८ च्या वेळेसह ५व्या स्थानावर राहिले. त्यामुळे भारतीय रिले संघ अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरले.

15:40 (IST) 9 Aug 2024
समारोप समारंभात श्रीजेश-मनू भारताचे ध्वजवाहक!

पुरुष हॉकी संघाला कांस्यपदक जिंकण्यात सिंहाचा वाटा असलेला निवृत्त गोलरक्षक पीआर श्रीजेश पॅरिस २०२४ ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप समारंभात पिस्तूल नेमबाज मनू भाकेरसह संयुक्त ध्वजवाहक असेल. IOA अध्यक्ष पीटी उषा यांनी याबाबत माहिती दिली.

14:52 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Medal Tally: पदकतालिकेत भारत कितव्या स्थानी

पॅरिस ऑलिम्पिक पदकतालिकेत अव्वल स्थान कायम राखत अमेरिकेने १०० पदकांचा टप्पा ओलांडला आहे, तर १४वा दिवस सुरू होण्यापूर्वी भारत ४ कांस्य आणि १ रौप्यपदकासह ६४व्या स्थानावर आहे. अमेरिकेने ३० सुवर्ण, ३८रौप्य आणि ३५ कांस्य पदकांसह १०३ पदके जिंकली आहेत आणि पदकांच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. चीन २९ सुवर्ण, २५ रौप्य आणि १९ कांस्य (एकूण ७३ पदकांसह) दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया १८ सुवर्ण, १४ रौप्य आणि १३ कांस्यांसह एकूण ४५ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

13:53 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: विनेश फोगट सुनावणी

पॅरिस ऑलिम्पिकमधून अतिरिक्त वजनामुळे विनेश फोगटला अपात्र ठरवल्यानंतर विनेश ने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद येथे याचिका देखील केली. यासंदर्भात सुनावणी आज १.३० वाजता सुरू होणार होती, पण त्याची वेळ आता पुढे ढकलण्यात आली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार ही सुनावणी आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५.३० ला सुरू होईल. ज्येष्ठ वकील हरीश साळवे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) प्रतिनिधित्व करणार आहेत.

13:38 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: अमन सेहरावत

भारताचा ५७ किलो वजनी गटात कुस्तीपटू अमन सेहरावत आज कांस्यपदकासाठी मैदानात दिसणार आहे. अमनने सलग दोन सामने जिंकत उपांत्य सामन्यात धडक मारली पण अव्वल चीनच्या अव्वल कुस्तीपटूकडून त्याचा पराभव झाला. यानंतर आज अमन ९.४५ वा कांस्यपदकासाठीच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे.

13:36 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: विनेश फोगट

कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद (CAS) सुनावणीत ज्येष्ठ वकील हरीश साळवे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) प्रतिनिधित्व करणार आहेत. साळवे, भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि किंग्ज काउंसिल यांनी पुष्टी केली की IOA द्वारे त्यांची नियुक्ती फोगटचे प्रतिनिधित्व करण्यासाठी क्रीडा कोर्टात केली आहे. तिची सुनावणी भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होणं अपेक्षित आहे.

13:35 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: १३व्या दिवशी दोन पदकं

पॅरिस ऑलिम्पिकच्या १३व्या दिवशी भारताने दोन पदकं जिंकली. हॉकी संघाने कांस्यपदकाला गवसणी घातली. पदक लढतीत भारताने स्पेनविरुद्ध २-१ असा विजय मिळवला. भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. तर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. नीरजने ८९.४५ मी भालाफेक करत रौप्यपदकाला गवसणी घातली.

13:34 (IST) 9 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: आजचे भारताचे वेळापत्रक

१२:३० वा: गोल्फ – दिक्षा डागर आणि अदिती अशोक महिला वैयक्तिक स्ट्रोक प्ले दुसरी फेरी.

२:१० वा: ऍथलेटिक्स – महिलांची ४x४००मी. रिले हीट (ज्योतिका श्री दांडी, किरण पहल, एम पूवम्मा राजू आणि विथ्या रामराज)

२:३५ वा: ऍथलेटिक्स – पुरुष ४x4४०० मीटर रिले हीट (अमोज जेकब, राजेश रमेश, संतोष कुमार तमिलरासन आणि मुहम्मद अजमल वरियाथोडी)

११:१० वा: अमन सेहरावत विरुद्ध पोर्तो रिकोचा डॅरियन क्रूझ पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल कांस्यपदक सामना.

India at Olympic Games Paris Day 14 Highlights: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ १४व्या दिवशी भारताने सहावं आणि कुस्तीतील पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकल. अमन सेहरावतने ५७ किलो वजनी गटात कांस्यपदकाला गवसणी घातली.