Antim Panghal out of Paris Olympic: एकीकडे ऑलिम्पिकचे शेवटचे काही दिवस शिल्लक असताना अनेक खेळांमध्ये भारताच्या पदकांच्या आशा मावळताना दिसत असताना एका खेळाडूवर कायदेशीर कारवाई झाल्यामुळे अडचणींमध्ये भर पडली आहे. जवळपास ५ ते ६ खेळांमध्ये भारताचे खेळाडू चौथ्या स्थानावर राहिल्यामुळे त्यांना पदकानं हुलकावणी दिली आहे. आता उरलेल्या दिवसांमध्ये काही खेळाडूंवर भारताची प्रामुख्याने भिस्त असेल. पण पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारी भारताची कुस्तीपटू अंतिम पांघालवर Paris Olympic व्यवस्थापनानं कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलं काय?

अंतिम पांघालवर ऑलिम्पिक व्यवस्थापनानं घालून दिलेल्या नियमांचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या नियमभंगामध्ये अंतिम पांघालच्या बहिणीला पॅरिस पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. तिची चौकशी केल्यानंतर तिला पोलिसांनी सोडलं. मात्र, त्यानंतर अंतिम पांघालला पुढील सामन्यांसाठी अपात्र ठरवण्यात आलं आणि तिच्या सपोर्ट स्टाफसह तिची पुन्हा भारतात रवानगी करण्यात आली आहे.

पॅरिसमध्ये ऑलिम्पिक गेम्स व्हिलेजमध्ये सर्व स्पर्धा खेळवल्या जात असून तिथेच खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी खेळाडू, त्यांचा सपोर्ट स्टाफ व इतर व्यक्तींसाठी काही नियम घालून दिले आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर व्यवस्थापनाकडून कारवाई करण्यात येते. ऑलिम्पिक गेम्स व्हिलेजमधून स्वत:चं काही सामान आणण्यासाठी अंतिम पांघालनं तिची बहीण निशाला पाठवलं होतं. पण ऑलिम्पिक गेम्स व्हिलेजमध्ये व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या पासेसशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही. निशाकडे अंतिम पांघालचा पास पाहून पोलिसांना संशय आला व त्यांनी निशाला ताब्यात घेतलं.

…आणि अंतिमवर थेट स्पर्धेबाहेर जाण्याची कारवाई!

निशाची चौकशी केल्यानंतर पॅरिस पोलिसांना सर्व प्रकार स्पष्ट झाला. यानंतर पोलिसांनी निशाला सोडलं खरं, पण स्वत:चा खेळाडू असल्याचा पास अंतिम पांघालनं दुसऱ्या व्यक्तीला वापरायला दिल्यामुळे झालेला नियमभंग व्यवस्थापनानं गंभीर मानला व त्यासाठी अंतिमवर थेट स्पर्धेतून बाहेर जाण्याची कारवाई करण्यात आली.

Paris Olympic: एक किलोच्या फरकानं मीराबाई चानूनं पदक गमावलं; आणखी एक स्वप्न भंगलं!…

अंतिमसाठी पहिली ऑलिम्पिक स्पर्धा आव्हानात्मक

अंतिमसाठी पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा प्रचंड आव्हानात्मक राहिली. विनेश फोगट ज्या गटात खेळायची, त्या ५३ किलो वजनी गटात अंतिम खेळत होती. पहिल्याच सामन्यात तिला तुर्कियेच्या येतगिल झेनेपकडून ०-१० असा मोठा पराभव पत्करावा लागला. यानंतरही अंतिमला कांस्य पदकाच्या शर्यतीत राहण्याची संधी होती. जर झेनेप अंतिम सामन्यात पोहोचली असती, तर अंतिम पांघालला रिपेचेसमध्ये पुढे जाण्याची संधी निर्माण झाली असती. मात्र, जर्मनीच्या अन्निका वेंडलनं उपांत्यपूर्व फेरीतच झेनेपचा पराभव केला आणि अंतिमच्या आशा संपुष्टात आल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris olympic update indian wrestler antim panghal sent back to india pmw
Show comments