Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अनेक खेळाडू हे त्यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे चर्चेत आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमधून अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. आता इजिप्तच्या कुस्तीपटूला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या २६ वर्षीय मोहम्मद अलसयदची पोलिस चौकशी केली जात आहे. पॅरिस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला पहाटे पाचच्या सुमारास अटक करण्यात आली. डिस्ट्रिक्ट कॅफेसमोरून त्याला ताब्यात घेण्यात आले. इजिप्तच्या स्टार खेळाडूने बारमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. घटनेच्या वेळी खेळाडू दारूच्या नशेत होता, असे सांगण्यात येत आहे. ऑलिम्पिकमध्ये ड्रग्जच्या प्रभावाखाली खेळाडूंनी गोंधळ घातल्याची प्रकरणे यापूर्वीच समोर आली आहेत. मोहम्मदने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ६७ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे. जो या ऑलिम्पिकमधील कुस्तीच्या सामन्यात अझरबैजानच्या हसरत जाफारोवकडून हरला आणि पदक जिंकण्यात अयशस्वी ठरला. सध्या या खेळाडूची सुटका झाली आहे की तो पोलिसांच्या ताब्यात आहे, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली आहेत. अलसयद याचा जन्म १६ मार्च १९९८ रोजी झाला आहे, त्याने जपानमधील टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासह अनेक चॅम्पियनशिपचे टायटल जिंकले आहेत. त्याने आफ्रिकन कुस्ती चॅम्पियनशिप आणि आफ्रिकन गेम्स तसेच मिलिटरी वर्ल्ड गेम्समध्ये अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याच्या ऑलिम्पिक पदकाव्यतिरिक्त, अलसायद त्याच्या वजनी गटातील एक प्रभावी खेळाडू आहे. त्याने २०१९ आफ्रिकन गेम्स आणि २०१९ मिलिटरी वर्ल्ड गेम्समध्ये ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग असोसिएशनने त्याला सर्वोत्कृष्ट अंडर-२३ कुस्तीपटू म्हणूनही गौरवले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यापूर्वी नेदरलँडकडून झालेल्या दारूण पराभवानंतर ऑस्ट्रेलियन पुरुष हॉकी संघाच्या खेळाडूला अटक करण्यात आली होती. २८ वर्षीय टॉम क्रेग याला ड्रग्ज विक्रेत्याकडून कोकेन खरेदी करताना पोलिसांनी अटक केली होती. ऑस्ट्रेलियन हॉकी संघ नेदरलँड्सकडून २-० असा पराभूत होऊन उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडला. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, क्रेग मध्यरात्री ९व्या एरोंडिसमेंटमधील इमारतीच्या बाहेर होता. संशयावरून त्याची झडती घेतली असता कोकेन जप्त करण्यात आले. त्याचवेळी ड्रग्ज विक्रेत्यालाही अटक करण्यात आली. आरोपी खेळाडूने एका अल्पवयीन विक्रेत्याकडून ड्रग्ज मागवले होते. पोलिसांनी आरोपींकडून ७ कोकेन आणि ७५ ड्रग कॅप्सूल जप्त केले आहेत.