Indian Hockey Team in Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाची दमदार कामगिरी कायम आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रविवारी (४ ऑगस्ट) ग्रेट ब्रिटनविरुद्ध खेळला गेला, जो खूपच रोमांचक होता. ज्यामध्ये भारतीय संघाने शूटआऊटमध्ये ४-२ अशा फरकाने सामना जिंकला. या विजयानंतर भारतीय संघाच्या सुमित कुमारने ज्या प्रकारे सेलिब्रेशन केले, ते पाहून चाहत्यांना सौरव गांगुलीची आठवण झाली, ज्याचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. या सामन्यात अमित रोहिदासला १७व्या मिनिटाला रेड कार्डस दाखवून बाहेर काढले होते. यानंतर भारतीय संघ ४३ मिनिटे केवळ १० खेळाडूंसह खेळत राहिला. अमितला रेड कार्ड देणे हाही सामन्याचा वादग्रस्त मुद्दा होता. ज्याला सोशल मीडियावर काही लोक 'बेईमानी' म्हणत आहेत. यानंतर ६० मिनिटांच्या निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला. त्यानंतर शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. या शूटआऊटमध्ये पीआर श्रीजेशने दोन उत्कृष्ट बचाव करत भारताला विजयापर्यंत पोहोचवले. भारताचा उपांत्य फेरीचा सामना आता अर्जेंटिना आणि जर्मनी यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्याशी होणार आहे. विजयानंतर मोठा जल्लोष, समालोचक झाले भावूक - विजयानंतर सुमित कुमारने सौरव गांगुलीच्या प्रसिद्ध सेलिब्रेशनची पुनरावृत्ती केली. सुमितने जर्सी काढून हवेत फिरवली. २००२ मध्ये नॅटवेस्ट ट्रॉफी फायनलमध्ये इंग्लंडला पराभूत केल्यानंतर गांगुलीने ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानाच्या बाल्कनीत आपली जर्सी काढून हवेत फिरवली. सामना जिंकल्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले समालोचक सुनील तनेजाही भावूक झाले. त्यांनाही अश्रू अनावर झाले. त्यांचा आवाजही दबला आणि त्यांना हुंदका आवरत नव्हता. यानंतर त्यांनी गोलरक्षक पीआर श्रीजेशचे कौतुक केले. हेही वाचा - Paris Olympics 2024 : स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये उष्णतेमुळे खेळाडू हैराण, भारताच्या क्रीडा मंत्रालयाने पुरवले ४० एसी, VIDEO व्हायरल शूटआऊटमध्ये काय झाले? ब्रिटनने पहिला शूटआउट घेतला आणि अल्बरी जेम्सीने गोल केला.भारताकडून पहिला शॉट घेण्यासाठी हरमनप्रीत सिंग आला आणि त्यानेही गोल केला.ब्रिटनसाठी वॉलेसने चेंडू घेतला आणि गोल केला.भारतासाठी सुखजीत आला आणि त्याने गोल करत स्कोअर २-२ असा बरोबरीत आणला.तिसऱ्या प्रयत्नात क्रोनन ब्रिटनसाठी आला आणि गोल चुकला.ललितने भारतासाठी तिसऱ्या प्रयत्नात गोल करत भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.चौथ्या प्रयत्नातही ब्रिटनला गोल करता आला नाही आणि श्रीजेशने ब्रिटीश खेळाडूसमोर उभे राहून गोल होऊ दिला नाही.भारतासाठी चौथ्या प्रयत्नात राजकुमारने गोल केला. अशाप्रकारे भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.