Paris Olympics 2024 Yusuf Dikec : "तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकून घेतलं सारं जग", ही म्हण पॅरिस ऑलिम्पिक मधील तुर्कियेचा नेमबाज युसूफ डिकेकला तंतोतंत लागू पडतेय. युसूफ डिकेकने (Yusuf Dikec) १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याने या स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. मात्र ज्यापद्धतीने युसूफने आपला खेळ सादर केला, त्यावरून तो आता सोशल मीडियावर चांगलाच भाव खात आहे. ५१ वर्षांचा युसूफ केवळ हातात पिस्तुल घेऊन आला आणि रौप्यपदक घेऊन गेला. डावा हात खिशात घालून उजव्या हाताने सहजपणे नेम धरणारा युसूफचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. नेहमीचा चष्मा आणि अचूक नेम धरला सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर युसूफ डिकेकचे फोटो आता व्हायरल होत आहेत. त्याला लाखो व्ह्यूज आणि कमेंट मिळत आहेत. युसूफचे कौतुक होण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे ऑलिम्पिकमध्ये जे इतर नेमबाज आहेत, ते ढिगभर ॲक्सेसरीज वापरताना दिसतात. ज्या नेमबाजांनी पदक जिंकले त्यांनी नेम धरताना डोळ्यांवर विशेष लेन्स, एका डोळ्याला कव्हर आणि कानांवर मोठे हेडफोन लावल्याचे पाहिले आहे. युसूफ मात्र या सर्वांना अपवाद ठरला. त्याने फक्त त्याच्या डोळ्यावरचा नेहमीचा चष्मा परिधान केला होता. हे वाचा >> Olympics 2024 : भारताला आज तीन पदकांची आशा; महाराष्ट्राचा नेमबाज अंतिम फेरीत, चालण्याच्या स्पर्धेत तिघांची फायनलमध्ये धडक ऑलिम्पिकमध्ये नेमबाज लक्ष विचलित होऊ नये म्हणू या सर्व ॲक्सेसरीज वापरत असतात. डोळ्यासमोर अंधारी येऊ नये म्हणून विशेष लेन्सेस वापरले जातात. तसेच आवाजाचा त्रास होऊ नये, म्हणून आवाज रोखणारे हेडफोन कानाला लावले जातात. पण याउलट ५१ वर्षीय युसूफने असा कोणताही तामझाम केला नाही. तो फक्त हातात पिस्तुल घेऊन आला. त्याच्या डोळ्यावर नेहमीचा चष्मा होता. जो पदक घेतानाही त्याच्या डोळ्यावर दिसतो. त्याने एक हात खिशात घालून अचूक नेम साधला. युसूफ डिकेकचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर मिम्स तयार केले जात आहेत. काही जण गमतीने त्याला तुर्कियेचा सिक्रेट एजंट म्हणत आहेत. तुर्कियेने चुकून त्यांचा हिटमॅन तर ऑलिम्पिकला पाठवला नाही ना? अशी गंमतीशीर शंका काही नेटिझन्स उपस्थित करत आहेत. थोडक्यात सुवर्णवेध हुकला युसुफ डिकेक (Yusuf Dikec) आणि त्याच्या संघाने चांगली कामगिरी केली असली तरी त्यांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. सर्बियाच्या झोराना अरुनोविक आणि दामिर माइकेक यांनी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यांनी तुर्कियेच्या युसूफ डिकेक आणि सेव्वल इलायदा तरहान यांचा १६-१४ ने पराभव केला. हे ही वाचा >> Olympics 2024 : भारताच्या खात्यात दुसरं पदक, नेमबाजीत मनू भाकेर, सरबजोत सिंह जोडीची कमाल तर याच स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर आणि सरबजोत सिंह या नेमबाजांच्या जोडीने भारताला १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक जिंकवून दिले आहे. या जोडीने दक्षिण कोरियाच्या ली ओन्हो आणि ओह ए जिन यांचा १६-१० अशा मोठ्या फरकाने पराभव करत कांस्यपदक पटकावले आहे.