Paris Olympics 2024 what is in the medalists wooden box : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये जग रोज नवनवीन चॅम्पियन पाहत आहे. ऑलिम्पिक आणि जागतिक विक्रम मोडले जात आहेत. या खेळांमध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्यपदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडू जेव्हा व्यासपीठावर उभे राहतात तेव्हा त्यांना पदकासह एक लांब लाकडी बॉक्स दिला जातो. या ऑलिम्पिकमधील सर्व पदक विजेत्यांना हा बॉक्स देण्यात आला आहे. मात्र, या छोट्याशा लाकडी बॉक्समध्ये नेमकं काय असतं? जाणून घेऊया.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विजेत्यांना दिली जातेय खास भेट –

प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना पदकासह एक खास भेट दिली जाते. यावेळीही असेच काहीसे दिले जात आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्व पदक विजेत्या खेळाडूंना ४० सेमी लाकडी बॉक्स दिला जात आहे. या बॉक्समध्ये पॅरिसचे अधिकृत पोस्टर आहे, जे हाताने तयार केले गेले आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे हे पोस्टर उगो गॅटोनी यांनी डिझाइन केले आहे. पोस्टर डिझाइन करण्यासाठी त्यांला चार महिने, २००० तास लागले आहेत. या पोस्टर्समध्ये पॅरिसच्या ऐतिहासिक वास्तूंचे चित्रण करण्यात आले आहे.

हे आयफेल टॉवर, सीन नदी आणि आर्क डी ट्रायम्फे दाखवते. या पोस्टरमध्ये ऑलिम्पिक रिंग, ऑलिम्पिक पदके आणि अनेक खेळांची चिन्हेही दाखवण्यात आली आहेत. पदकाचा रंग पोस्टरच्या बाहेर तपशीलवार लिहिला आहे. यासोबतच खेळाडूंना मेस्कट खेळणीही दिली जात आहेत. या खेळण्यावर पदकाच्या रंगात ब्राव्हो असे लिहिले आहे.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 8 : तिरंदाजीत दीपिका कुमारीची चमकदार कामगिरी; उपांत्यपूर्व फेरीत दाखल, मनू भाकेरची पदकांची हॅट्ट्रिक हुकली

पदक विजेत्यांना बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार?

फोर्ब्सच्या अहवालानुसार, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना किमान ३३ देश रोख बक्षिसे देतील. यापैकी १५ देश असे आहेत, जे सुवर्णपदकासाठी $1,00,000 (अंदाजे ८२ लाख रुपये) पेक्षा जास्त रक्कम देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देतील. भारतातील क्रीडा मंत्रालयाने २०१९ मध्ये जाहीर केले होते की वैयक्तिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना ७५ लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना ५० लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्यांना ३० लाख रुपये मिळतील.