बुडापेस्ट : पॅरिस सेंट-जर्मेन संघाने युरोपीय क्लब फुटबॉलवरील मक्तेदारी पुन्हा अधोरेखित करताना सलग दुसर्‍यांदा प्रतिष्ठेच्या ‘यूएफा चॅम्पियन्स लीग’चे जेतेपद पटकावले. अतिशय संघर्षपूर्ण झालेल्या अंतिम लढतीत फ्रेंच क्लब सेंट-जर्मेनने इंग्लिश क्लब आर्सेनलचा नियमित वेळ आणि अतिरिक्त वेळेतील १-१ अशा बरोबरीनंतर ‘पेनल्टी शूटआऊट’मध्ये ४-३ असा पराभव केला. त्यामुळे आर्सेनलचे प्रथमच ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले. 

काही वर्षांपूर्वीपर्यंत लिओनेल मेसी, नेयमार आणि किलियन एम्बापे यांसारख्या तारांकितांचा भरणा असूनही सेंट-जर्मेनला चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवता येत नव्हते. मात्र, सेंट-जर्मेनचे व्यवस्थापन आणि प्रशिक्षक लुईस एनरिके यांनी मिळून काही कठीण निर्णय घेताना तारांकित खेळाडूंऐवजी एकजुटीला प्राधान्य दिले. त्यांनी नव्याने संघबांधणी करताना युवा खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले. याचा फायदा त्यांना सलग दोन हंगामांत मिळाला आहे. एनरिके यांचे कुशल मार्गदर्शन आणि खेळाडूंचा सांघिक खेळ यामुळे सेंट-जर्मेनला चॅम्पियन्स लीगचा करंडक आपल्याकडे राखण्यात यश आले आहे.

‘‘भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. या हंगामाच्या सुरुवातीपासूनच प्रशिक्षक आमच्याशी वारंवार संवाद साधत होते. चॅम्पियन्स लीग जिंकणे अवघड आहेच, पण जेतेपद टिकवणे त्याहूनही अवघड आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही अधिक मेहनत घेतली आणि मानसिकदृष्ट्या कणखर राहत पुन्हा यशस्वी झालो,’’ असे सेंट-जर्मेनचा कर्णधार मार्किनियॉस म्हणाला.

सेंट-जर्मेनचा आक्रमक खेळ 

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे शनिवारी रात्री झालेल्या अंतिम लढतीत आर्सेनलने सुरुवात दमदार केली. पाचव्याच मिनिटाला काय हावेट्झने गोल करत आर्सेनलला आघाडीवर नेले. यानंतर मात्र आर्सेनलने पूर्णपणे बचावात्मक पवित्रा अवलंबला. याचा सेंट-जर्मेनला फायदा झाला. त्यांनी चेंडूवर ताबा राखत आक्रमणाची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. पूर्वार्धात त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. परंतु उत्तरार्धात ६५व्या मिनिटाला सेंट-जर्मेनला पेनल्टी किक मिळाली. यावर बॅलन डी’ओर पुरस्कार विजेत्या ओस्मान डेम्बेलेने चेंडू गोलजाळ्यात अचूक मारत सेंट-जर्मेनला १-१ अशी बरोबरी करून दिली. यानंतर नियमित वेळ आणि त्यानंतर ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ यात ही बरोबरीची कोंडी कायम राहिली. सेंट-जर्मेनने विजयी गोलसाठी प्रयत्न केले, परंतु आर्सेनलचा बचाव भेदणे त्यांना शक्य झाले नाही, तसेच आर्सेनलचा गोलरक्षक डाव्हिड रायानेही काही फटके अप्रतिमरीत्या अडवले.

आर्सेनलचे अपयश

त्यानंतर झालेल्या ‘पेनल्टी शूटआऊट’मध्ये सेंट-जर्मेनकडून पाचपैकी केवळ एक खेळाडू (नुनो मेंडेस) चुकला, तर आर्सेनलच्या एबेरेची एझे आणि गॅब्रिएल मागहाएस या दोघांना गोलजाळीचा वेध घेता आला नाही. त्यामुळे सेंट-जर्मेनने प्रत्येकी पाच पेनल्टीअंती ४-३ अशी बाजी मारली.

‘युरोपीय चषका’चे १९९२ मध्ये ‘युएफा चॅम्पियन्स लीग’ असे नामकरण झाल्यापासून केवळ दोन संघांना स्पर्धेचे जेतेपद राखता आले आहे. रेयाल माद्रिदने २०१६, २०१७, २०१८ असे सलग तीन वेळा ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आता पॅरिस सेंट-जर्मेनला सलग दोनदा जेतेपद मिळवण्यात यश आले आहे.