गॉल कसोटीत श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू दिनेश चंडिमल क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. दुखापत गंभीर असल्याने चंडिमलला रुग्णालयात नेण्यात आलं. मानेची दुखापत असल्याचं निष्पन्न झाल्याने चंडिमल या सामन्यात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं.

चंडिमल उर्वरित सामना खेळू शकणार नसल्याने लाईक अ लाईक रिप्लेसमेंट पासिंदू सूरियाबंदाराला संधी मिळाली. आयसीसीच्या या नियमानुसार, खेळाडूच्या हेल्मेटला, डोक्याला किंवा मानेसारख्या संवेदनशील भागाला दुखापत झाली आणि उपचारादरम्यान ही दुखापत गंभीर असल्याचं स्पष्ट होऊन खेळाडू सामन्याबाहेर गेला तर बदली खेळाडूचा समावेश करता येतो. अशी मुभा देण्यात आली आहे. मात्र या नियमाचा कोणत्याही संघाने गैरफायदा घेऊ नये यासाठी लाईक अ लाईक रिप्लेसमेंट ही संज्ञा निश्चित करण्यात आली. उदाहरणार्थ, एखादा गोलंदाज दुखापतग्रस्त झाला तर बदली खेळाडूला फक्त गोलंदाजीच करता येईल. या घटनेत फलंदाज दिनेश चंडिलम दुखापतग्रस्त झाला आहे. चंडिमल यष्टीरक्षणही करतो. या सामन्यात त्याच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी नसली तरी अनेक वर्ष तो यष्टीरक्षक म्हणून कार्यरत होता. एखाद्या संघाने खेळाडूच्या अतिरिक्त कौशल्याचा फायदा उठवू नये यासाठी लाईक अ लाईक रिप्लेसमेंट घेण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं.

फलंदाजाऐवजी गोलंदाज किंवा गोलंदाजाऐवजी फलंदाज असा बदली खेळाडू घेता येत नाही. श्रीलंकेच्या संघात पासिंदू हा राखीव फलंदाज होता. त्यामुळे चंडिमलच्या जागी तातडीने त्याचा समावेश करण्यात आला. तो क्षेत्ररक्षण करू शकतो मात्र त्याला या सामन्यात गोलंदाजी करता येणार नाही. पुढच्या सामन्यात मूळ अंतिम अकरात असल्यास पासिंदूला गोलंदाजीही करता येईल.

पासिंदूने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ५३ फर्स्ट क्लास सामन्यात ५४.३६च्या सरासरीने ५००० धावा केल्या आहेत. पासिंदूच्या नावावर १४ शतकं आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे.

काँकशन सब म्हणून संघात येणाऱ्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं नसेल तर त्याचा ज्या क्षणी अंतिम अकरात समावेश झाला ते आंतरराष्ट्रीय पदार्पण मानलं जाईल. सामन्याच्या आकडेवारीत तसा उल्लेख करण्यात येतो. २०२० मध्ये झिम्बाब्वेच्या ब्रियान मुडझिग्यानामा याला काँकशन सब म्हणून संघात घेण्यात आलं. तो आधी झिम्बाब्वेसाठी खेळला नव्हता. त्याचं आंतरराष्ट्रीय पदार्पण झालं. मॅट पार्किन्सन, नील रॉक, कामरान गुलाम, खाया झोंडो, बाहीर शहा, हर्षित राणा, पासिंदू सूरियाबंदारा यांनी काँकशन सबच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आहे.

पासिंदूचं पदार्पण मात्र उल्लेखीय झालं नाही. फिरकीपटू मानव सुतारने पहिल्याच चेंडूवर त्याला बाद करत तंबूत धाडलं. तत्पूर्वी पासिंदूने क्षेत्ररक्षण करताना रवींद्र जडेजाचा अफलातून झेल घेतला होता.