अबू धाबी : गतविजेत्या वेस्ट इंडिजला यंदा ट्वेन्टी-२० विश्वचषकात ‘अव्वल-१२’ फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. चरिथ असलंका (४१ चेंडूंत ६८ धावा) आणि पथुम निस्सांका (४१ चेंडूंत ५१) यांच्या अर्धशतकांमुळे श्रीलंकेने गुरुवारी विंडीजवर २० धावांनी मात केली.

१९० धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीजला श्रीलंकेच्या गोलंदाजांनी २० षटकांत ८ बाद १६९ धावांवर रोखले. शिमरॉन हेटमायर (नाबाद ८१) आणि निकोलस पूरन (४६) यांनी विंडीजसाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र किरॉन पोलार्ड (०), ख्रिस गेल (१) आणि आंद्रे रसेल (२) या त्रिकुटाच्या अपयशामुळे त्यांना तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

यापूर्वीच आव्हान संपुष्टात आलेल्या श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना विंडीजचा कर्णधार पोलार्डचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय चुकीचा ठरवत २० षटकांत ३ बाद १८९ धावांचा डोंगर उभारला. निस्सांका आणि कुशल परेरा (२९) यांनी ४२ धावांची सलामी दिली. परेरा बाद झाल्यावर भरवशाच्या असलंकाने निस्सांकासह दुसऱ्या गड्यासाठी ६० चेंडूंत ९१ धावांची भागीदारी रचून विंडीजवर दडपण टाकले. दोघांनीही स्पर्धेतील प्रत्येकी दुसरे अर्धशतक नोंदवले. अखेरच्या षटकात कर्णधार दसून शनकाने (१४ चेंडूंत नाबाद २५ धावा) फटकेबाजी केल्याने श्रीलंकेने पावणेदोनशे धावांचा टप्पा गाठला.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : २० षटकांत ३ बाद १८९ (चरिथ असलंका ६८, पथुम निस्सांका ५१; आंद्रे रसेल २/३३) विजयी वि. वेस्ट इंडिज : २० षटकांत ८ बाद १६९ (शिमरॉन हेटमायर नाबाद ८१; निकोलस पूरन ४६; वानिंदू हसरंगा २/१९)