ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा नवा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. झहीर खानला पाहून मला एक वेगवान गोलंदाजही नेतृत्व करू शकतो, अशी प्रेरणा मिळाल्याचे कमिन्सने म्हटले आहे. कमिन्स २०१७ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) संघाचा भाग होता. त्या संघाचा कर्णधार झहीर खान होता.

झहीर खानने ज्या पद्धतीने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे नेतृत्व केले त्याचे कमिन्सने कौतुक केले आहे. पर्थ नाऊच्या बातमीनुसार, तो म्हणाला, ”टी-२० मधील झहीरचे कर्णधारपद मला खूप आवडले. त्याने उत्कृष्ट पद्धतीने संघाचे नेतृत्व केले. त्याच्याकडे गोलंदाजीच्या खूप कल्पना होत्या आणि तो मला मैदानाची मांडणी आणि रणनीती बनवण्यात खूप मदत करत असे. मला त्याचा खूप फायदा झाला. वेगवान गोलंदाज कर्णधार होण्यात काही नुकसान आहे, असे मला वाटत नाही.”

हेही वाचा – VIDEO : Mum‘BOYS’..! मुंबईकर क्रिकेटपटूंचा धमाल ‘नागिन’ डान्स; हिटमॅन, श्रेयससह लॉर्ड ठाकूरही थिरकला!

ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून पॅट कमिन्स, तर स्टीव्ह स्मिथकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रिची बेनॉड यांच्यानंतर पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा पूर्णवेळ कर्णधार असणारा पहिला वेगवान गोलंदाज असेल. पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा दोन वर्षे उपकर्णधार होता आणि आता त्याला टिम पेनच्या जागी कर्णधार बनवण्यात आले आहे. पॅट कमिन्सला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा फारसा अनुभव नाही. याआधी त्याने केवळ देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यू साउथ वेल्सचे कर्णधारपद भूषवले होते.

कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा ४७वा कसोटी कर्णधार ठरला आहे. एका महिलेला अश्लील फोटो आणि संदेश पाठवल्याबद्दल खेद व्यक्त करत पेनने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ऍशेस मालिका होणार आहे.