Australia Updates Squad for T20 WC 2026: टी-२० विश्वचषक २०२६ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वच संघ या मोठ्या स्पर्धेसाठी कसून सराव करत आहेत. पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज व कर्णधारच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या टी-२० वर्ल्डकप संघातही मोठे बदल झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या संघात आणखी एक बदल करण्यात आला आहे. मॅथ्यू शॉर्टला वगळण्यात आले आहे आणि त्याच्या जागी फॉर्मात असलेल्या मॅट रेनशॉला संघात स्थान देण्यात आलं आहे. स्टीव्ह स्मिथलाही या विश्वचषकासाठी संघातून वगळण्यात आलं आहे. जोश हेझलवूड, टिम डेव्हिड आणि नॅथन एलिस हे सर्वजण विश्वचषक खेळण्यासाठी फिट घोषित करण्यात आलं आहे.

हेझलवूडला अ‍ॅशेसपूर्वी हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. ज्यामुळे तो बराच काळ संघाबाहेर होता. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे डेव्हिड बीबीएल सामने आणि पाकिस्तान मालिकेला मुकला, तर एलिस हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बीबीएल अंतिम फेरी आणि पाकिस्तान दौऱ्याला मुकला होता. पण हे तिघेही फिट होऊन संघात परतले आहेत.

पॅट कमिन्स गेल्या बऱ्याच काळापासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. ज्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी, अॅशेस मालिका आणि आता टी-२० विश्वचषकाला तो मुकणार आहे. पॅट कमिन्सच्या जागी बेन द्वारशुईसला संघात संधी देण्यात आली आहे. पॅट कमिन्सच्या जागी बेन द्वारशुइसला संघात आणण्याबाबत ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी सांगितलं की तो संघाला डावखुरा वेगवान गोलंदाजाचा पर्याय देईल. तो एक चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे आणि अखेरच्या षटकांमध्ये काही धावा करू शकतो.

बेन द्वारशुइसने ऑस्ट्रेलियासाठी १३ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने शेवटचा टी-२० सामना नोव्हेंबर २०२५ मध्ये ब्रिस्बेन येथे भारताविरुद्ध खेळला होता. मॅट रेनशॉने फक्त एकच टी-२० सामना खेळला आहे. या वर्षी २९ जानेवारी रोजी लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने टी-२० मध्ये पदार्पण केलं.

टी-२० विश्वचषक २०२६ साठी ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ

मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस, कॅमेरून ग्रीन, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, जोश हेझलवूड, मॅथ्यू कुनहेमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट रेनशॉ, मार्कस स्टोइनिस, अॅडम झाम्पा

ऑस्ट्रेलियाचा संघ ११ फेब्रुवारी रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने टी-२० वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात करेल. त्यांचा पुढील सामना १३ फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध होईल. ऑस्ट्रेलिया त्यांचे सुरुवातीचे दोन सामने कोलंबोमध्ये खेळेल. त्यानंतर, त्यांचा सामना १६ फेब्रुवारी रोजी पल्लेकेले स्टेडियमवर श्रीलंकेशी होईल. ऑस्ट्रेलिया त्यांचा शेवटचा सामना २० फेब्रुवारी रोजी ओमानविरुद्ध खेळेल.