तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासह ॲशेस मालिका जिंकण्याची संधी असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे सोपविण्यात आली आहे. हा सामना १७ डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हलवर रंगणार आहे.

पाठीच्या दुखापतीमुळे कमिन्सला पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते. मात्र, आता तंदुरुस्त झाला असून तिसऱ्या कसोटीसाठी १५ जणांच्या चमूत त्याला स्थान देण्यात आले आहे. संघात हा एकमेव बदल आहे.

बदली कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली पहिले दोन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. ॲशेस करंडक आपल्याकडेच राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ही लढत अनिर्णित राखली तरी चालणार आहे. ब्रिस्बेन येथे दिवस-रात्र झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्रमुख फिरकीपटू नेथन लायनला संघाबाहेर ठेवले होते. मात्र, तिसऱ्या कसोटीसाठी लायन आणि कमिन्स हे दोघेही अंतिम ११ खेळाडूंत परतणे अपेक्षित आहे.

पाठीच्या दुखापतीतून सावरलेला सलामीवीर उस्मान ख्वाजाचे १५ जणांच्या चमूतील स्थान कायम आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत ट्रॅव्हिस हेड आणि जेक वेदराल्ड यांनी सलामीला चांगली कामगिरी केली. त्यामुळे ख्वाजाला अंतिम ११ खेळाडूंत पुनरागमन करणे अवघड जाऊ शकेल.

संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जेक वेदराल्ड, मार्नस लबूशेन, स्टीव्ह स्मिथ, जोश इंग्लिस, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), कॅमरुन ग्रीन, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड, ब्रेंडन डॉगेट, नेथन लायन, मायकल नीसर, ब्यू वेबस्टर, उस्मान ख्वाजा.