SRH Captaincy Update: Pat Cummins returns to IPL 2026 soon: सनरायझर्स हैदराबादचा संघ यंदा इशान किशनच्या नेतृत्त्वाखाली स्पर्धेतील सुरूवातीचे सामने खेळत आहे. हैदराबाद संघासाठी आयपीएल २०२६ ची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. पराभवाने सुरूवात करत संघाने दुसरा सामना जिंकला आणि त्यानंतर पुन्हा दोन सामने गमावले. यानंतर पुढील सामन्यात हैदराबादने देशांतर्गत क्रिकेटमधील नव्या गोलंदाजांना संधी देत संघ संयोजनात मोठा बदल केला आणि विजय मिळवला. आता पुन्हा एकदा संघामध्ये मोठा बदल होणार असल्याची अपडेट समोर आली आहे.
इशान किशन सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवत नेतृत्त्व करत आहे, पण काही सामन्यांनंतर त्याचं कर्णधारपद जाणार आहे. या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्स संघात परतणार आहे. मात्र, जोपर्यंत कमिन्स मैदानात उतरत नाही, तोपर्यंत तो संघाचे नेतृत्व करत राहील.
सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्त्वाची जबाबदारी पॅट कमिन्सकडे आहे. मात्र, पाठीच्या दुखण्यामुळे तो अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही. आता समोर आलेल्या अपडेटनुसार तो पूर्णपणे बरा झाला असून भारतात परतण्याची तयारी करत आहे. ऑस्ट्रेलियाकडून त्याला आयपीएल खेळण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे.
क्रिकबझच्या एका वृत्तानुसार, कमिन्स गोलंदाजीसाठी पूर्णपणे सज्ज आहे. तो १७ एप्रिल रोजी भारतात दाखल होऊन संघात सामील होईल. वृत्तानुसार, बुधवारी सिडनीमध्ये केलेल्या स्कॅनमध्ये तो पाठीच्या दुखण्यातून पूर्णपणे बरा झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, जेव्हा आयपीएल सुरू झाली, तेव्हा पॅट कमिन्स भारतात आला आणि संघासोबत दिसला होता, पण त्याला एकाही सामन्यात खेळता आला नाही. पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाला परतावे लागलं. आता त्याला त्याच्या क्रिकेट बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाला आहे.
सनरायझर्स हैदराबादचा पुढचा सामना १८ एप्रिल रोजी हैदराबादमध्ये सीएसकेविरुद्ध होणार आहे. त्यानंतर संघ २१ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पुन्हा मैदानात उतरेल. पॅट कमिन्स या दोन सामन्यांमध्ये खेळणार नाही असं मानले जात आहे. तो २५ एप्रिल रोजी होणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यासाठी संघात परतण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत, इशान किशनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने यावर्षी पाच सामने खेळले आहेत. त्यांनी दोन जिंकले असून तीन सामने गमावले आहेत. याचा अर्थ संघाकडे चार गुण असून तो सध्या चौथ्या स्थानावर आहे. पुढील दोन सामने निर्णायक असतील. संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. पॅट कमिन्स कधी परतल्याने त्यांचा गोलंदाजी विभाग अधिक मजबूत होईल.
