Pat Cummins Catch Video: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना ग्रेनेडाच्या नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव २८६ धावांवर आटोपला. दरम्यान या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडिजला सुरूवातीलाच ३ मोठे धक्के बसले आहेत. यादरम्यान केसी कार्टीला बाद करण्यासाठी पॅट कमिन्सने भन्नाट झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, वेस्टइंडिजची फलंदाजी सुरू असताना केसी कार्टी फलंदाजी करत होता. त्यावेळी ९ वे षटक टाकण्यासाठी कर्णधार पॅट कमिन्स गोलंदाजीला आला. या षटकातील दुसरा चेंडू कार्टीने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू बॅटची कडा घेत हवेत गेला. त्यावेळी गोलंदाजी करत असलेल्या पॅट कमिन्सने डाव्या बाजूला धावत जाऊन डाईव्ह मारली आणि एका हाताने भन्नाट झेल घेतला. या शानदार झेलमुळे कार्टीचा डाव अवघ्या ६ धावांवर आटोपला. गोलंदाजी करताना धावत जाऊन झेल पकडणं मुळीच सोपं नसतं. पण, कमिन्सने सहज धावत जाऊन हा झेल घेतला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियाचा हा प्लॅन फसला. कारण ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या २८६ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून सॅम कॉन्टास २५ तर उस्मान ख्वाजा १६ धावांवर माघारी परतला. तर कॅमरून ग्रीनने २६, स्टीव्ह स्मिथने ३, ट्रॅव्हिस हेडने २९ धावांची खेळी केली. तर ब्यू वेबस्टरने ६० आणि अॅलेक्स कॅरीने ६३ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव २८६ धावांवर आटोपला.

वेस्टइंडिजला सुरूवातीलाच ३ मोठे धक्के

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडिजला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. सलामीला आलेला क्रेग ब्रेथवेट शून्यावर माघारी परतला. तर जॉन कॅम्पबेलने ४० धावांची खेळी केली. त्यानंतर पॅट कमिन्सच्या शानदार झेलमुळे केसी कार्टी अवघ्या ६ धावांवर तंबूत परतला. वेस्टइंडिजला अवघ्या ६४ धावांवर तिसरा धक्का बसला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.