Pathum Nissanka Stunning Catch Video: श्रीलंकेचा स्फोटक फलंदाज पथुम निसांकाने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात सर्वांना आश्चर्यचकित करणारा झेल टिपला. टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सुपर-८च्या दृष्टीने महत्त्वाचा सामना श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वादळी सुरूवात केली. पण श्रीलंकेने कमालीचं पुनरागमन केलं. यादरम्यान निसांकाने झेल पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ज्याचा व्हीडिओदेखील व्हायरल होत आहे.

पल्लेकल्लेच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याची नाणेफेक यजमान संघाने जिंकत कांगारू संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. दुखापतीनंतर परतलेल्या मिचेल मार्शने वादळी फलंदाजी केली. तर ट्रॅव्हिस हेडदेखील फॉर्मात परतला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचली. तर मार्श-हेड अनुक्रमे ५४ व ५६ धावा करत बाद झाले.

हेड-मार्शच्या वादळी सुरूवातीनंतर कॅमेरून ग्रीन ३ धावा तर टीम डेव्हिड ६ धावा करत झेलबाद झाले. यानंतर ग्लेन मॅक्सवेल व जोश इंग्लिस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ग्लेन मॅक्सवेल मैदानावर सेट झाल्यानंतर त्याने एका षटकात चौकार-षटकार लगावले. पण पुढच्याच षटकात हेमंताच्या षटकात तो झेलबाद झाला. ग्लेन मॅक्सवेलचा पथुम निसांकाने कमालीचा झेल टिपत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सर्वच जण निसांकाचा झेल पाहून डोळे विस्फारत पाहत राहिले. हवेत उडत त्याने हा अनपेक्षित झेल टिपला.

निसांकाने टिपलेला झेल पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

दुष्मंता हेमंता १७व्या षटकात गोलंदाजी करत होता. मॅक्सवेल पहिल्याच चेंडूवर स्ट्राईकवर होता. तो खाली गुडघ्यावर बसत रिव्हर्स स्वीप मारायला गेला आणि चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने हवेत गेला. चौकारासाठी जाणारा चेंडू पाहताच मागच्या दिशेने निसांकाने हवेत उडी घेतली आणि अनपेक्षित झेल टिपला. निसांकाचा झेल पाहून डगआऊटमध्ये बसलेला लसिथ मलिंगा चकित होत जागेवरून उठला आणि जयसूर्याकडे जाऊन टाळी देत आनंद व्यक्त केला.

ग्लेन मॅक्सवेल १५ चेंडूत २२ धावा करत बाद झाला. मॅक्सवेलने विकेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या षटकात ३ विकेट्स गमावल्या आणि परिमाणी संघ १८१ धावा करत २०व्या शटकातील अखेरच्या चेंडूवर झेलबाद झाला. फक्त ट्रॅव्हिस हेड व मिचेल मार्श यांनीच चांगली फलंदाजी केली. इतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पुन्हा एकदा फेल ठरले. ऑस्ट्रेलियाने जर श्रीलंकेविरूद्धचा हा सामना गमावला तर संघ टी-२० विश्वचषकाच्या गट टप्प्यातून बाहेर होऊ शकतो.