Pathum Nissanka Highest Run Scorer in International Cricket 2024: पाथुम निसांकाच्या शानदार शतकी कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा ८ गडी राखून पराभव केला. या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने चौथ्या डावात २१९ धावा केल्या होत्या. श्रीलंकेने हे लक्ष्य २ गडी गमावून पूर्ण केले. पाथुम निसांकाने दुसऱ्या डावात श्रीलंकेसाठी शानदार शतक झळकावले. त्याने १२७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि संघाला विजय मिळवून देतच माघारी परतला. त्याच्या या खेळीमुळे श्रीलंकेला हा सामना सहज जिंकण्यात यश आले.
पाथुम निसांका संघासाठी सर्वात मोठा हिरो ठरला. त्याने शतक झळकावून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्याच्यामुळेच श्रीलंकेने १० वर्षांनंतर इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना जिंकला आहे. या सामन्यात निसांकाने एकामागून एक अनेक विक्रम रचले आहेत.
२०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
इंग्लंडविरूद्ध पाथुम निसांकाने १२४ चेंडूंत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२७ धावा केल्या. या शतकी खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १०२.४२ होता. हे शतक झळकावताच तो २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने कुसल मेंडिसलाही मागे टाकले आहे. निसांकाने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११३५ धावा केल्या आहेत. तर मेंडिसने ११११ धावा केल्या आहेत. भारताचा यशस्वी जैस्वाल तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्या नावावर १०३३ धावा आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
पाथुम निसांका – ११३५ धावा
कुसल मेंडिस – ११११ धावा
यशस्वी जैस्वाल – १०३३ धावा
रोहित शर्मा – ९९० धावा
जो रूट – ९८६ धावा
पाथुम निसांका खास क्लबमध्ये सामील
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना शतक झळकावणारा पाथुम निसांका हा ७वा परदेशी फलंदाज ठरला आहे. निसांकापूर्वी गॉर्डन ग्रीनिज, आर्थर मॉरिस, डॉन ब्रॅडमन, ग्रॅम स्मिथ, शाई होप आणि कॉनरॅड हंट यांनी ही कामगिरी केली होती. आता इंग्लंडविरुद्ध शतक झळकावल्यानंतर निसांका या दिग्गज खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात विजयी शतक ठोकणारा निसांका हा श्रीलंकेचा पाचवा खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा – Ganesh Chaturthi: बांगलादेशच्या खेळाडूने गणेश चतुर्थीनिमित्त केली बाप्पाची प्रतिष्ठापना, फोटो केले शेअर
श्रीलंकेसाठी चौथ्या डावात मॅचविनिंग शतक झळकावणारे फलंदाज
१५३ – कुसल परेरा, २०१९
१४३ – अरविंदा डी सिल्वा, १९९८
१२७ – पथुम निसांका, २०२४
१२३ – महेला जयवर्धने, २००६
१२२ – दिमुथ करुणारत्ने, २०१९
इंग्लंडमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना शतके झळकावणारे परदेशी फलंदाज
२१४ – गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज), १९८४
१८२ – आर्थर मॉरिस (ऑस्ट्रेलिया), १९४८
१७३ – डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया), १९४८
१५४ – ग्रॅम स्मिथ (दक्षिण आफ्रिका), २००८
१२७ – पथुम निसांका (श्रीलंका), २०२४
११८ – शाई होप (वेस्ट इंडिज), २०१७
१०८ – कॉनरॅड हंटे (वेस्ट इंडीज), १९६३