पीटीआय, पालेकेले – झिम्बाब्वेपाठोपाठ श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागल्याने ऑस्ट्रेलियाचे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले आहे. दुशान हेमंताच्या (३७ धावांत ३ बळी) प्रभावी गोलंदाजीनंतर सलामीवीर पथुम निसांकाच्या (५२ चेंडूंत नाबाद १००) आक्रमक शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ‘ब’ गटाच्या सामन्यात सोमवारी ऑस्ट्रेलियावर आठ गडी आणि १२ चेंडू राखून विजय मिळवला. या विजयामुळे श्रीलंकेचे ‘अव्वल आठ’ फेरीतील स्थान निश्चित झाले असून ऑस्ट्रेलियाला आता इतर संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्याी श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. कुसाल परेराच्या (१) रुपात संघाला पहिला धक्का बसला. यानंतर मात्र निसांका व कुसाल मेंडिस (३८ चेंडूंत ५१ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून दुसर्याम गड्यासाठी ९७ धावांची भागीदारी रचत संघाला शंभरी गाठून दिली.

मार्कस स्टोइनिसने मेंडिसला बाद करीत ही भागीदारी मोडीत काढली. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार व एक षटकार लगावला. दुसर्याा बाजूने निसांकाने संघाची धावगती कमी होणार याची काळजी घेतली. निसांकाने यानंतर पवन रत्नायके (१५ चेंडूंत नाबाद २८) याच्यासह ७९ धावांची अभेद्य भागीदारी रचत श्रीलंकेला १८ षटकातच विजय मिळवून दिला. निसांकाने आपल्या खेळीत १० चौकार व पाच षटकारांची आतषबाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टोइनिस (२/४६) वगळता कोणत्याही गोलंदाजाला चमक दाखवता आली नाही. ऑस्ट्रेलियाने क्षेत्ररक्षणही ढिसाळ केले.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणार्याी ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर कर्णधार मिचेल मार्श (५४) आणि ट्रॅव्हिस हेड (५६) यांनी पहिल्या गड्यासाठी १०४ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या खेळावरून ऑस्ट्रेलिया २२५ च्या पुढे मजल मारेल असे चित्र होेते. मात्र, तसे झाले नाही. सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर जोश इंग्लिस (२७) व ग्लेन मॅक्सवेल (२२) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेने मैदानात चांगले झेल पकडले, यात निसांकाने मॅक्सवेलचा पकडलेला झेप लक्षवेधी ठरला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : २० षटकांत सर्वबाद १८१ (ट्रॅव्हिस हेड ५६, मिचेल मार्श ५४; दुशान हेमंता ३/३७, दुश्मंता चमीरा २/३६) पराभूत वि.श्रीलंका : १८ षटकांत २ बाद १८४ (पथुम निसांका नाबाद १००, कुसाल मेंडिस ५१, पवन रत्नायके नाबाद २८; मार्कस स्टोइनिस २/४६)
=सामनावीर : पथुम निसांका

२ ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शतकी खेळी करणारा पथुम निसांका श्रीलंकेचा दुसरा फलंदाज. यापूर्वी २०१० मध्ये महेला जयवर्धनेचे शतक. १८२ ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत धावांचा यशस्वी पाठलाग करताना श्रीलंकेच्या आतापर्यंत सर्वाधिक धावा. ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग. ९७ कुसाल मेंडिसचे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून सर्वाधिक ९७ षटकार. यापूर्वी दसुन शनाकाचे नावे ९६.

झिम्बाब्वे-आयर्लंड सामना निर्णायक

झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात आज, मंगळवारी सामना होणार आहे. झिम्बाब्वेने या सामन्यात विजय नोंदविल्यास ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात येईल. आयर्लंडने या लढतीत विजय नोंदविल्यास ऑस्ट्रेलियाचे आव्हान शाबूत राहू शकेल. श्रीलंका सध्या सहा गुणांसह गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. झिम्बाब्वेचे दोन सामन्यांत चार गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा अखेरचा सामना ओमानविरुद्ध आहे. झिम्बाब्वे आता आयर्लंड आणि श्रीलंकेकडून पराभूत होईल अशी ऑस्ट्रेलियाला आशा करावी लागेल.