रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. रोहितने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या नावे अनेक विक्रम आहेत. रोहित शर्माच्या नावे टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार, सर्वाधिक शतकं तर कर्णधार म्हणून सर्वाेत्कृष्ट रेकॉर्ड आगे. पण आता रोहित शर्माचा एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आयर्लंडच्या ३५ वर्षीय खेळाडूने हा विश्वविक्रम मोडला आहे. हा ३५ वर्षीय खेळाडू आयर्लंडचा कर्णधार आहे.
आयर्लंडचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज पॉल स्टर्लिंगने रोहितचा विक्रम मागे टाकला आहे. युएईविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात खेळताच त्याने हा ऐतिहासिक पराक्रम केला. रोहित शर्माने त्याच्या नेतृत्त्वाखाली टी-२० विश्वचषक २०२४ जिंकून दिल्यानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विश्वचषक जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने ही घोषणा केली होती.
रोहित शर्माचा सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा विश्वविक्रम मोडला गेला आहे. आयर्लंडचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज पॉल स्टर्लिंगने रोहितचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने २००७ मध्ये आपल्या टी-२० कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. रोहितने त्याच्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत १५९ टी-२० सामने खेळले. जवळजवळ दोन वर्षांनंतर, हा विक्रम आता मोडला गेला आहे.
आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर यूएई विरुद्ध त्याच्या टी-२० कारकिर्दीतील १६० वा सामना खेळला. यासह, तो क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला. पण, स्टर्लिंग त्याचा ऐतिहासिक सामना आणखी खास करू शकला नाही आणि तो फक्त ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
सर्वाधिक टी२० सामने खेळणारे खेळाडू
पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) – १६० सामने
रोहित शर्मा (भारत) – १५९ सामने
जॉर्ज डॉकरेल (आयर्लंड) – १५३ सामने
मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) – १४८ सामने
जोस बटलर (इंग्लंड) – १४४ सामने
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत नवीन नावं समोर येत असली तरी, सर्वाधिक कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम अजूनही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याच्या २३ वर्षांच्या कारकिर्दीत, सचिनने २०० कसोटी सामने आणि ४६३ एकदिवसीय सामने खेळले. सध्याच्या घडीला टी-२० आंतरराष्ट्रीय सामने मोठ्या संख्येने खेळवले जात आहेत. त्यामुळे पॉल स्टर्लिंगचा हा विक्रम किती काळ टिकणार, यावर सर्वाच्या नजरा असतील.

