IPL 2026 PBKS beat GT by 3 wickets: गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल २०२६ मधील सामना चांगलाच अटीतटीचा झाला. अखेरच्या षटकांपर्यंत सामन्याचं माप सातत्याने दोन्ही बाजूच्या दिशेने झुकत होता. कधी गुजरातचे गोलंदाज तर कधी पंजाबचे फलंदाज बाजी मारत होते. पण अखेरीस पंजाब किंग्सने विजय आपल्या बाजूने झुकवला. पंजाब किंग्सच्या या विजयाचा हिरो कुपर कॉनोली ठरला. एका टोकाकडून लागोपाठ विकेट्स पडत असताना कॉनोलीने एकट्याने संघाचा डाव सावरला आणि संघाला विजय मिळवून देतच माघारी परतला.
गुजरातने दिलेल्या १६३ धावांचा पाठलाग करताना प्रियांश आर्यने षटकाराने सुरूवात केली. पण रबाडाच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. यानंतर कुपर कॉनोली व प्रभसिमरन सिंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी रचली. प्रभसिमरन २४ चेंडूत ३७ धावा करत बाद झाला. तर श्रेयस अय्यर २ दणदणीत षटकार लगावत बाद झाला. पंजाबची स्थिती एका वेळेस ११० धावांवर २ विकेट्स अशी होती आणि लागोपाठ विकेट्स गमावल्यानंतर संघाने ११८ धावांवर ६ विकेट्स गमावल्या.
प्रसिध कृष्णाला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून १२ व्या षटकात गोलंदाजीला आणलं आणि त्याने २ षटकांत ३ विकेट्स घेत पंजाबपासून सामना दूर नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एका टोकाकडून विकेट्स पडत असताना पदार्पणवीर कुपर कॉनोलीने अर्धशतक झळकावत संघाचा डाव सावरत होता. मार्काे यान्सनने कॉनोलीला चांगली साथ दिली. पण १८व्या षटकात यान्सन अशोक शर्माच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर आलेल्या झेवियर बार्टलेटने प्रसिद्ध कृष्णाच्या १९व्या षटकात षटकार खेचला आणि संघाला विजयाच्या अधिक जवळ नेलं.
पंजाब किंग्सने सामन्याची नाणेफेक जिंकत गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. गुजरातकडून साई सुदर्शन व शुबमन गिलच्या जोडीने सावध सुरूवात केली. पण मार्काे यान्सने साईला बाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्यानंतर शुबमन गिल व जोस बटलरने सावध फलंदाजी केल्या. गिल २७ चेंडूत ३९ धावा करत बाद झाला तर जोस बटलरने ३८ धावांचं योगदान दिलं. तर ग्लेन फिलिप्स २५ धावा आणि वॉशिंग्टन सुंदरने १८ धावांचं योगदान देत संघाला १६२ धावांपर्यंत नेलं. श्रेयस अय्यरचं उत्तम नेतृत्त्व आणि गोलंदाजीत बदल केल्यामुळे गुजरातला फारश्या धावा करण्याची संधी मिळाली नाही. पंजाबकडून मार्काे यान्सनने १ विकेट तर युझवेंद्र चहलने २ आणि विजयकुमार वैशाकने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
