मुंबई इंडियन्सला स्पर्धेतील सलग चौथा सामना गमावावा लागला आहे. पंजाब किंग्सने मुंबईचा त्यांच्या घरच्याच मैदानावर ७ विकेट्सने आणि २१ चेंडू शिल्लक ठेवत एकतर्फी पराभव केला आहे. मुंबई इंडियन्सचे गोलंदाज सातत्याने अपयशी पडत असल्याने संघाला याचा फटका बसत आहे. तर पंजाब किंग्सने पुन्हा एकदा सांघिक कामगिरीच्या बळावर आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे.

मुंबई इंडियन्सने दिलेल्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १६.३ षटकांत एकतर्फी सामना जिंकला. प्रियांश आर्या १५ धावा करत झेलबाद झाला. प्रभसिमरन सिंगने ३९ चेंडूत ११ चौकार व २ षटकारांसह ८० धावांची वादळी खेळी केली. याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यरने ३५ चेंडूत ५ चौकार व ४ षटकारंसह ६६ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने फिल्डिंगमध्ये हार्दिक पंड्याला झेलबाद करण्यासाठी बार्टलेटच्या जोडीने कमालीचा रिले कॅच पकडला.

श्रेयस अय्यरशिवाय कुपर कॉनोलीने १७ धावांचं आणि मार्कस स्टॉयनिसने १० धावांचं योगदान दिलं. श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांनी १३९ धावांची मॅचविनिंग भागीदारी रचली आणि मुंबईने तिथेच सामना गमावला. मुंबईकडून अल्लाह गझनफरने २ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने १ विकेट घेतली.

पंजाबने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. मुंबईची सुरूवात पुन्हा एकदा खराब झाली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत क्विंटन डीकॉकला संधी मिळाली. रायन रिकल्टन व डीकॉकची जोडी सलामीला उतरली. रिकल्टन २ धावा तर पुढच्याच चेंडूवर सूर्या गोल्डन डकवर बाद झाला. यानंतर क्विंटन डी कॉक व नमन धीर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ चेंडूत १२२ धावांची भागीदारी रचली. नमन धीर ३१ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक करत बाद झाला.

मुंबईकडून रोहितच्या अनुपस्थितीमुळे क्विंटनला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं आहे. क्विंटनने या सामन्यात ६० चेंडूत ८ चौकार व ७ षटकारांसह ११२ धावांची खेळी केली. हार्दिक पंड्याने १४ धावांचं तर तिलक वर्माने ८ धावांचं योगदान दिलं. यासह मुंबईने प्रथम फलंदाजी करताान २० षटकांत ६ बाद १९५ धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीपने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर मार्काे यान्सन व शशांक सिंग यांनी १-१ विकेट्स घेतल्या.