Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Highlights: आयपीएल २०२६ स्पर्धेतील १७ वा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांअखेर २१९ धावांचा डोंगर उभारला होता. पंजाब किंग्जला हा सामना जिंकण्यासाठी २२० धावांचा भलामोठा डोंगर सर करायचा होता. या आव्हानाचा पाठलाग करताना आधी प्रियांश आर्य, मग प्रभसिमरन सिंग आणि शेवटी कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद अर्धशतकी खेळी करुन ६ गडी राखून दमदार विजय मिळवून दिला. हा पंजाबचा सलग तिसरा विजय ठरला आहे.
या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ २२० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला होता. त्यामुळे पंजाब किंग्जला पावरप्लेमध्ये चांगल्या सुरूवातीची गरज होती. ही सुरुवात प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्यने करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९९ धावा जोडल्या. पावरप्लेच्या षटकांमध्ये दोघांनी मिळून ९३ धावा जोडल्या. प्रियांश आर्यने २० चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकांरांच्या साहाय्याने ५७ धावांची खेळी केली. तर प्रभसिमरन सिंगने २५ चेंडूत ५१ धावा केल्या. तर कुपर कॉनोलीने ११ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने ३३ चेंडूत नाबाद ६९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ५ षटकार खेचले. त्याला शशांक सिंगने चांगली साथ दिली. यासह पंजाबने २२० धावांचा यशस्वी पाठलाग करून ६ गडी राखून विजय मिळवला.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांअखेर २१९ धावा केल्या होत्या. या हैदराबादला देखील पावरप्लेमध्ये चांगली सुरुवात मिळाली होती. अभिषेक शर्माने २८ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ८ षटकार खेचले. तर ट्रॅव्हिस हेडने २३ चेंडूत ३८ धावांचे योगदान दिले. कर्णधार इशान किशनने २७ धावा केल्या. तर हेनरिक क्लासेनने ३९, अनिकेत वर्माने १८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर हैदराबादने २१९ धावांचा डोंगर उभारला होता.
या सामन्यात अभिषेक शर्मा आणि प्रियांश आर्य या दोन्ही फलंदाजांनी वेगवान अर्धशतकं झळकावली. पहिल्या डावात फलंदाजी करताना अभिषेक शर्माने १८ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना प्रियांश आर्यने १५ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
