पाकिस्तानी क्रिकेट संघात सध्या खूप उलथापालथ सुरू आहे. माजी अनुभवी क्रिकेटपटू रमीझ रझा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाल्यापासून अनेक बातम्या समोर आल्या आहेत. टी-२० वर्ल्डकपला काही दिवस शिल्लक असताना मिसबाह आणि वकार यांनी पाकिस्तानची साथ सोडली. त्यानंतर आता त्यांची जागा कोण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता माध्यमांच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन टी-२० वर्ल्डकपसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी घेऊ शकतो.

रमीझ यांच्या नियुक्तीनंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याच्या जागी सकलेन मुश्ताक आणि अब्दुल रज्जाक यांना हंगामी प्रशिक्षक बनवल्याच्या बातम्या समोर आल्या. आता वर्ल्डकपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धा लक्षात घेऊन बोर्डाने हेडनला संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि व्हर्नान फिलँडरला गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी दिली आहे.

 

हेही वाचा – PL 2021 : CSK चा ‘स्टार’ क्रिकेटपटू बिग बॉसमध्ये जाणार?; VIDEO मध्ये म्हणाला…

टी-२० विश्वचषक यंदा १७ ऑक्टोबरपासून ओमानमध्ये सुरू होत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला दुबईत खेळला जाईल. भारतीय संघ २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

वर्ल्डकपची सुरुवात पहिल्या फेरीने होणार असून पहिला सामना १७ ऑक्टोबर रोजी यजमान ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात खेळला जाईल. पहिल्या फेरीत ८ संघ सुपर १२मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतील. आयर्लंड, नेदरलँड, श्रीलंका आणि नामिबियाला अ गटात ठेवण्यात आले आहे, तर गट ब गटामध्ये ओमान, पीएनजी, स्कॉटलंड आणि बांगलादेश हे संघ आहेत. प्रत्येक गटातील फक्त अव्वल २ संघ दुसऱ्या फेरीत म्हणजेच सुपर १२ मध्ये प्रवेश करतील.