Mohsin Naqvi On Pakistan Cricket Team Trolling: पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. याच फ्लॉप कामगिरीची दखल घेऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मालिका सुरू असतानाच धक्कादाक निर्णय घेत, मुख्य प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक आणि संघातील ७ खेळाडूंना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. आता पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी भारत -आयर्लंड मालिकेचं उदाहरण देऊन टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मालिका सुरू असताना फ्लॉप कामगिरी करणाऱ्या एखाद्या खेळाडूला बसवणं ही सामान्य बाब आहे. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रमुख संघातील ७ खेळाडूंना संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला. यासह संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षकाला देखील पदावरुन काढून टाकलं. मोहसीन नक्वी यांनी मान्य केलं की, पाकिस्तान क्रिकेट सध्या अडचणीत आहे. पण त्यांनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मोहसीन नक्वी काय म्हणाले?

मोहसीन नक्वी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नक्वी म्हणाले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, दक्षिण आफ्रिकेला नामिबियाने पराभूत केलं. भारतीय संघाला आयर्लंडने पराभूत केलं, त्यानंतर क्रिकेट संपलं का? एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आम्हाला ज्यावेळी जो खेळाडू संघात हवा असेल, आम्ही त्याला संधी देणार. जर एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत नसेल, तर आम्ही काय करणार? प्रत्येक मालिका आमच्यासाठी महत्वाची आहे.”

तसेच सलमान अली आघाबद्दल बोलताना मोहसीन नक्वी म्हणाले की, “सलमान अली आघा उत्तम फलंदाज आहे, पण सध्या तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. आम्ही त्याला घरी जा आणि आराम कर असं म्हटलेलं नाही. आम्ही त्याच्यासोबत चर्चा केली आणि त्याला स्पष्टपणे सांगितलं आहे. आम्ही कोणालाच संघाबाहेर करत नाही आहोत. जो चांगली कामगिरी करणार तो संघात कायम राहणार. फ्लॉप कामगिरी करणाऱ्या खेळाडूची जागा जाणार.”