Mohsin Naqvi Viral Video: भारत आणि पाकिस्तान होणाऱ्या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. कारण पाकिस्तानला नेहमी वाटतं की, ते भारतीय संघावर सहज विजय मिळवू शकतात. पण नेहमीच भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागतो. या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजयाची नोंद केली. हा सामना पाहण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी देखील कोलंबोत उपस्थित होते. पण पाकिस्तानचा पराभव समोर दिसताच त्यांनी पळ काढला.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा फ्लॉप ठरला. पण इशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. इशान किशनने ७७ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ३२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ७ गडी बाद १७६ धावा केल्या.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांकडून फ्लॉप शो पाहायला मिळाला. डावातील सुरुवातीच्या २ षटकात पाकिस्तानचे ३ फलंदाज तंबूत परतले होते. पाकिस्तानकडून एकट्या उस्मान खानने ४४ धावांची खेळी केली. इतर कुठल्याही खेळाडूला हवी तशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानच्या डावातील १२ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर कुलदीप यादवने मोहम्मद नवाजला बाद करताच मोहसीन नक्वी यांनी स्टेडियममधून पळ काढला. पीटीआयवर मोहसीन नक्वी स्टेडियम सोडून जात असल्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

भारतीय संघाचा सुपर ८ मध्ये प्रवेश

पाकिस्तानला पराभूत करून भारतीय संघाने सुपर ८ फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारतीय संघाने आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये दमदार विजयाची नोंद केली आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात अमेरिकेवर विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात नामिबियाला धूळ चारली. आता तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. ३ पैकी ३ सामने जिंकून भारतीय संघाने ६ गुणांची कमाई केली आहे. तर दुसरीकडे भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं संकट आहे. पाकिस्तानला जर सुपर ८ मध्ये प्रवेश करायचा असेल, तर नामिबियाला पराभूत करावं लागणार आहे. तर दुसरीकडे अमेरिकेकडेही सुपर ८ मध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे.