तब्बल ३८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतभेटीवर आलेल्या महान फुटबॉलपटू पेले यांनी दर्दी चाहत्यांच्या साक्षीने निरोप घेतला. फुटबॉल मैदानावरचा अद्भुत करिश्मा असे वर्णन होणाऱ्या पेले यांना ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्यासाठी हजारो दर्दी चाहत्यांनी राजधानी दिल्लीतील आंबेडकर मैदानावर एकच गर्दी जमली होती. वायुदलातर्फे आयोजित सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीला पेले उपस्थित होते.

दोन्ही संघांच्या खेळाडूंची ओळख झाल्यानंतर पेले यांनी उघडय़ा जीपमधून चाहत्यांना अभिवादन केले. यावैळी त्यांचे छायाचित्र टिपण्यासाठी एकच झुंबड उडाली. ‘पेले.. पेले..’ असा जयघोष काही वेळ वातावरणात निनादत होता. तेव्हा चाहत्यांना धन्यवाद करीत पेले यांनी अभिवादन केले. यंदाच्या वर्षांत तीन शस्त्रक्रिया झालेल्या पेले यांनी प्रकृती बरी नसल्यामुळे भाषण केले नाही. त्यांनी शांतपणे बसून सामन्याचा आनंद लुटला. यावेळी वायुदलाचे प्रमुख अरुप राहा उपस्थित होते. शनिवारी पहाटेच पेले मायदेशी रवाना होणार आहेत.
तत्पूर्वी, रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या तीन क्रीडापटूंचा पेले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिल्लीत दाखल होण्याआधी पेले तीन दिवस कोलकाता येथे होते. ३८ वर्षांपूर्वी पेले यांच्याविरुद्ध खेळलेल्या मोहन बागानच्या खेळाडूंचा पेले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान उपस्थित होते. इंडियन सुपर लीग स्पर्धेतील अ‍ॅटलेटिको डी कोलकाता आणि केरळ ब्लास्टर्स लढतीला ते उपस्थित होते.