Ajinkya Rahane On Critiscism: आयपीएल २०२६ स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला. पण होम ग्राऊंडवर खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला ६५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी करणारा कर्णधार अजिंक्य रहाणे या सामन्यात स्वस्तात माघारी परतला. या सामन्यात तो १० चेंडूत अवघ्या ८ धावा करून माघारी परतला. या कामगिरीनंतर त्याच्या स्ट्राईक रेटवरून जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान अजिंक्य रहाणेने टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
सामना झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला स्ट्राईक रेटवरून प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, “२०२३ पासून ते आतापर्यंत माझा स्ट्राईक रेट सर्वोत्तम राहिला आहे. जे लोक माझ्या स्ट्राईक रेटवरून टीका करत आहेत, ते एकतर माझी फलंदाजी पाहत नसतील किंवा माझ्यावर टीका करणं हा अनेकांचा अजेंडा आहे. मी खेळतोय हे त्यांना आवडत नसेल. मला वाटतं, मला मिळालेल्या यशाचा त्यांना हेवा वाटतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी फार चिंतेत नाही. कधी कधी फलंदाज म्हणून लय सापडत नाही. जे टीका करत आहेत, एकतर त्यांना खेळ कळत नाही किंवा मग त्यांना वाटत असेल की मी वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करावी. पण सकारात्मक असो की नकारात्मक, ते माझ्याबद्दल चर्चा करत आहेत याचा मला आनंद आहे.”
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने ५२ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने ४८ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने ४६ धावांची खेळी केली. हैदराबादने २० षटकांअखेर २२६ धावांचा डोंगर उभारला. हैदराबादने दिलेल्या २२७ धावांचा पाठलाग करताना अंगकृष रघुवंशीने ५२ धावांची खेळी केली. पण त्याला इतर कुठल्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. कोलकाताचा डाव १६१ धावांवर आटोपला. यासह हैदराबादने हा सामना ६५ धावांनी आपल्या नावावर केला.
