पेप गॉर्डिओला यांनी इंग्लिश क्लब मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ॲश्टन व्हिलाविरुद्ध होणार्या हंगामातील अखेरच्या सामन्यानंतर गॉर्डिओला मँचेस्टर सिटीला निरोप देणार आहेत.
गॉर्डिओला यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मँचेस्टर सिटीने तब्बल २० जेतेपदे मिळवली. यात एकूण सहा इंग्लिश प्रीमियर लीग जेतेपदांचाही समावेश आहे. गॉर्डिओला यांच्या मार्गदर्शनाखालीच मँचेस्टर सिटीने २०२१ ते २०२४ अशा सलग चार हंगामांत प्रीमियर लीग जिंकत इतिहास घडवला. २०२२-२३च्या हंगामात सिटीने प्रीमियर लीग, चॅम्पियन्स लीग आणि ‘एफए चषक’ अशा तीन मोठ्या स्पर्धा जिंकण्याची किमया साधली होती. यंदाच्या हंगामात सिटीने लीग चषक आणि ‘एफए चषक’ या स्पर्धांचे जेतेपद मिळवले आहे.
मँचेस्टर सिटीशी जोडले जाण्यापूर्वी गॉर्डिओला यांनी बार्सिलोना (२००८-१२) आणि बायर्न म्युनिक (२०१३-१६) या बलाढ्य क्लबचेही प्रशिक्षकपद यशस्वीरीत्या भूषवले होते. त्यामुळे त्यांची फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांमध्ये गणना केली जाते. आता मँचेस्टर सिटीच्या प्रशिक्षकपदी एन्झो मारेस्का यांची निवड केली जाणार असल्याचे वृत्त आहे. मारेस्का यांनी गॉर्डिओला यांचे साहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच त्यांना लिस्टर सिटी आणि चेल्सी या संघांना मार्गदर्शन करण्याचाही अनुभव आहे.
